स्वामी अमलानंद

स्वामी अमलानंद यांचे मूळ नाव लक्ष्मण रामचंद्र फडके असून त्यांचा जन्म दि.७ जानेवारी १९०३ रोजी मुंबई येथे झाला.त्यांचे मॅॅट्रिक पर्यतचे  शिक्षण पेण येथे झाले.मुंबई येथील कस्टम खात्यात ते नोकरीस लागले.नोकरी करीत असतानाच   लक्ष्मणरावांनी अनेक इंग्रजी-संस्कृत ग्रंथांचे वाचन केले तसेच .अध्यत्मिक ग्रंथही वाचले. त्यात दासबोध त्यांच्या अत्यंत आवडीचा ग्रंथ होता.  लक्ष्मणरावांचा मनमोकळा स्वभाव, काम चोख करण्याची हातोटी,नि:स्वार्थी वृत्ती, उत्तम हस्ताक्षर, नम्रपणा या त्यांच्या गुणांमुळे लक्ष्मणरावांना त्यांच्या खात्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली.  ९ डिसेंबर १९२५ रोजी लक्ष्मणरावांचा पेण मधीलच भिडे यांच्या कन्या सौ.दुर्गा यांच्याशी विवाह झाला. पण १९२८ मध्ये आलेल्या प्लेगच्यासाथीने सौ. दुर्गा यांचा बळी घेतला आणि लक्ष्मणरावांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. पण मातोश्रींनी लगेच एप्रिल मध्ये मालगुंड च्या केळकर यांची कन्या सौ. शांता यांच्यासोबत लक्ष्मणरावांचे दुसरे लग्न लावून दिले.

असे असले तरी लक्ष्मणरावांची अंतरीची अध्यात्माचीआवड जागृत होती. ते पहाटे उठून ध्यानास बसत असत. एकदा ते ध्यानास बसले असता ध्यानामध्ये  त्यांना "एकाएकी आकाशातून फुलांचा वर्षाव होत आहे, आपण उंच अधांतरी नीलआकाशी जात आहोत" असा अनुभव आला. दाही दिशातून आनंद ओसंडत होत होता. रोज ते जवळच्या अक्कलकोट स्वामींच्या मठात दर्शनासाठी जात असत. अध्यात्मिक पुस्तकांसोबतच लक्ष्मणरावांनी ज्योतिषशास्त्रावरच्या ग्रंथांचाही भरपूर अभ्यास केला होता. नोकरी करत असताना एक तपाचा कालखंड संतांच्या दर्शनात, आध्यात्मिक पुस्तकांच्या वाचनात गेला. अनेक संत, सत्पुरुषांचे दर्शनघेतले तरी लक्ष्मणराव त्यांचे अनुग्रहित झाले नव्हते. गुरुदेव रानडे यांच्याकडे"नाम मिळावे" अशी वारंवार विनवणी करूनही त्यांनी दीक्षा दिली नव्हती.१९४७ ते १९४९ या काळात श्री. भालचंद्र तुळजापूरकर ऊर्फ भारतीशास्त्री यांची प्रवचने झाली. त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लक्ष्मणरावांनी भारतीशास्त्रींशी परिचय करून घेऊन त्यांच्याकडून काही मंत्रोपासना मिळवली होती.तसेच भारतीशास्त्रींनी त्यांना थोडे मार्गदर्शनही केले होते. पण ही उपासना सुरु करताच लक्ष्मणरावांना विलक्षण अनुभव येऊ लागले. पण हा खरा परमार्थ नाही हे त्यांच्यासोबत फिरताना लक्ष्मणरावांच्या लक्षात आले. काही काळ लक्ष्मणराव पुण्यास बिडकर महाराजांचे शिष्य रावसाहेब सहस्रबुद्धे यांच्याकडे जात असत. पण कोणीच त्यांना अनुग्रह देत नव्हते.मात्र मनात सद्गुरू भेटीची तळमळ होती.

आणि २५ सप्टेंबर १९५२ रोजी विठ्ठलराव जोशी यांच्याहस्ते स्वामींनी लक्ष्मणरावांना अनुग्रहाचा कागद पाठवला. तो कागद मस्तकी लावताच ३ तास लक्ष्मणराव भाव समाधीत होते. झाल्या घटनेने सारेच अवाक झाले होते. स्वामीच तुमचे नियतगुरू आहेत, असे विठ्ठलराव त्यांना म्हणाले.लक्ष्मणरावांना सारेच अनाकलनीय वाटत होते. त्यानंतर जितके दिवस विठ्ठलराव मुंबईमध्ये होते तेवढे दिवस लक्ष्मणराव त्यांच्याकडे जाऊन ह्या परंपरेची माहिती घेत होते. विठ्ठलराव मुंबईमध्ये कधी येणार ह्याची लक्ष्मणराव वाटच पाहत असत. त्यांना अनेक प्रश्न विचारत असत. विठ्ठलराव हे सुद्धा अधिकारी होते. पण प्रत्येकवेळी विठ्ठलराव त्यांना काहीतरी कारण सांगून पावसला  जाऊ देत नसत. तरी लक्ष्मणरावांची स्वामीचरणावरील श्रद्धा ढळली नाही.

हळूहळू अखंड सोऽहं भजनात लक्ष्मणराव रंगून जात होते.स्वामी स्वरूपानंदांनी विठ्ठलरावांच्या हस्ते जे अमोघदान दिले होते ते आता काम करू लागले होते संसारातील ऐहिकसुखाचा उरलासुरला शेष सुद्धा नष्ट झाला होता.मी-तू पणाचा भाव मावळत चालला होता. लक्ष्मणराव सोऽहंध्यासातून ध्यानाकडे, ध्यानातून ज्ञानाकडे, ज्ञानातून स्वानंदभोगाकडे झेपावत चालले होते. मनात अनेकदा पावसला जाण्याचा संकल्प करूनही तो संकल्प पूर्ण  होत नव्हता.

१९५९ मध्ये एकदा लक्ष्मणरावांचा भाचा विसुभाऊ भट रत्नागिरीस जाणार होता. जमल्यास स्वामींचे दर्शन घेऊन येणार होता. हे कळल्यामुळे अत्यंत आनंदित होऊन लक्ष्मणरावांनी स्वामींना  एक पत्र लिहून पाठवले. ते वाचून अत्यंत आनंदित होऊन स्वामींनी प्रेमभराने लक्ष्मणरावांची चौकशी करून त्यांना उत्तरादाखल एक छोटे पत्र पाठवले. याच आधारे जानेवारी ते एप्रिल १९५९ याकाळात लक्ष्मणरावांनी स्वामींशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार सुरु केला. त्या पत्रांना स्वामींनी देखील तितक्याच तत्परतेने उत्तरे दिली. एके रात्री लक्ष्मणरावांना स्वप्नात मच्छिन्द्रनाथांनी दृष्टांत दिला. 'गुरुभेट घे 'असे सांगितले. योगायोग असा की त्याच वेळी स्वामींनी पत्रातून 'सवडीने पावसला येऊन जा' असे कळवले होते. त्यानुसार लक्ष्मणराव पावसला गुरुभेटीसाठी गेले. घनानंद मूर्ती पाहताच  मन हरपून लक्ष्मणरावांचे मस्तक गुरुचरणी कधी टेकले ते त्यांनाही कळले नाही. तेव्हा स्वामींनी त्यांना चार सहा दिवस ठेऊन घेतले. सद्गुरू सहवासात ते अमृताच्या चांदण्यात न्हात होते. यानंतर दरवर्षी सवड काढून किमान एक आठवडा लक्ष्मणराव पावसला स्वामींच्या जवळ जाऊन राहत होते. स्वामींसोबत एकांती ध्यानास बसण्याचे भाग्य लक्ष्मणरावांना अनेकदा मिळाले. असेच इतर गलबला बाजूला सारून गुरुशिष्य संवाद देखील निर्विघ्नपणे साधता आला. अशाप्रकारे साधनेत प्रगती होऊन सहज समाधीत रंगून जाण्याची  किमया लक्ष्मणरावांनी साधली होती.

एकदिवस स्वामींनी लक्ष्मणरावांना अमृतानुभवातील एक अभंग वाचायला दिला. त्याच्या चार ओळी वाचून झाल्या. पुढच्या ओळी वाचण्यासाठी लक्ष्मणराव देहभानावरच राहिले नाहीत. देहभानावर येताच स्वामी त्यांना म्हणाले -"हीच सोऽहं सिद्धी. आता असेच चालू राहू दे. हीच सहजावस्था होऊन जाईल. ही परंपरा आता आपण पुढे चालवा. जो कोणी योग्य जीव दिसेल त्याला या परंपरेत सहभागी करून घ्या. हे ईश्वरी कार्य आहे. सद्गुरूंनी मला जे जे दिले ते तुम्हाला पूर्णपणे दिले गेले आहे. ते तुम्ही भावी पिढयांना द्या. आनंद करा." स्वामींनी हात उंचावून आशीर्वाद दिला. हात आकाशी उंचावून लक्ष्मणरावांना स्वामी म्हणाले -"हा तिकडून आलेला आदेश आहे. तो सारं काही करून घेईल. निर्भय, निर्धास्त असा." स्वरूपसत्तेत समरसून गेल्यामुळे स्वानंदानुभव सतत प्रकटत राहिला होता.एकांती बोलताना स्वामी म्हणाले होते - " आता ह्या अवस्थेला, आनंदालाच खुणेने संबोधावयाचे - अमलानंद म्हणून. आता काही घ्यायचे उरले नाही. काही द्यायचे उरले नाही." एका पत्रात स्वामींनी लिहिले होते -"परमशांती म्हणजे शुद्ध आनंद, म्हणजेच अमलानंद."भक्त प्रेमाने, त्यांच्यावरील श्रद्धेने त्यांना मामा असे म्हणत असत. पण स्वामी देहरूपाने असताना आपण गुरुपद स्वीकारायचे नाही हा निश्चय अमलानंदांनी निष्ठेने पाळला.

नंतर अमलानंद पेण येथे स्थायिक झाले. हनुमान आळीतील 'जानकी निवास' हे सद्गुरुभावाचे एक सरोवर तयार झाले.अमलानंदांनी तिथे स्वामींचे भावमंदिर उभे केले. जानकी निवासात अनेक स्वामीभक्तांची मांदियाळी जमू लागली. नाथपंथातील घनदाट, परिपूर्ण, आनंदमय असे गुरुभक्तीचे साम्राज्य सर्वांकरिता उभारून स्वामी स्वरूपानंदांची परंपरा स्वामी अमलानंद यांनी पुढे चालवली. त्यानंतर त्यांनी यासंप्रदायाची धुरा पाच शिष्यांवर सोपवली आहे. एक म्हणजे कोल्हापूर येथील म. अ.कुलकर्णी. त्यांना स्वामी प्रज्ञानंद म्हणून भूषवले. दुसरे म्हणजे आपले द्वितीयपुत्र पुरुषोत्तम फडके. ते सहज अवस्थेत असल्याने त्यांना स्वामी सहजानंद असे भूषित केले. त्यांच्यावर पेण येथील मठाची जबाबदारी सोपविली आहे. तिसरे मामांचे  भाचे,स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य श्री शंभुराव भट म्हणजेच म. दा. भट.त्यांचा अधिकार ओळखून मामांनी त्यांचा स्वामी अवधूतानंद असे संबोधिले. चौथे म्हणजे स्वामींचे शिष्य मधुभाऊ पटवर्धन. यांचे स्वामी माधवानंद असे नामकरण करून त्यांना अधिकार दिला. पाचवे शिष्य हे पुण्याचे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य दा. के. पांडे यांना विद्यानंद हे नामाभिधान देऊन अधिकार दिले. मामांनी मृत्युपत्र करून स्थावर मालमत्तेचा ट्रस्ट केला.

१५ऑगस्ट १९८७ ला स्वामींच्या पुण्यतिथीसाठी मुंबईला जाऊन आल्यावर कफाचा खूप त्रास होऊ लागल्याने मामांच्या सर्व चाचण्या केल्या. त्यात मामांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. हळू हळू मामांचा देह क्षीण होत होता. त्यामुळे उपचार त्यांना सहन होणार नाहीत. म्हणून त्यांना जेवढे आनंदी ठेवता येईल तेवढे ठेवावे असे डॉक्टरांनी सांगितले. पण नंतर त्यांचा आजार खूपच बळावला. त्यांना अतिशय वेदना होत होत्या. अन्नावरची त्यांची वासना उडाली. नंतर मामांना मुंबईस आणण्यात आले.साऱ्यांनी मामांची सेवा केली. शेवटी १७ एप्रिल १९८८ रोजी ब्राह्ममुहूर्तावर मामांनी या नश्वर देहाचा त्याग केला. त्यानंतर बाराव्या दिवशी स्वामी सहजानंद व स्वामी प्रज्ञानंद यांच्या हस्ते समाधी स्थळी अस्थिकलश ठेवला. त्यानंतर त्याच ठिकाणी सुंदर समाधी मंदिर उभारले आहे.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना