स्वरूपाश्रमाची व्यवस्था कमी पडू लागल्यामुळे सेवामंडळाने समाधिमंदिराच्या दक्षिण बाजूस गौतमी नदीच्या पलीकडील तीरावर १९८६ साली सुमारे ८२ गुंठे जागा खरेदी करून त्या जागेवर नंतर भक्तनिवासाची भव्य वास्तू उभारली. सध्या दर्शनार्थी भक्तांच्या निवासाची व्यवस्था याच वास्तूमध्ये केली जाते. भक्तनिवासाची ३ मजली इमारत असून त्यात १५ फूट बाय १२ फुटाच्या सुमारे साठ खोल्या आहेत.एकूण सात हजार चौरस फूट जागेत दहा मोठे हॉल आहेत. इमारतीच्या बाहेर वाहनांच्या पार्किंगसाठी प्रशस्त व्यवस्था आहे. काही खोल्यांमध्ये अटॅच टॉयलेट आहे. इथे सकाळी भक्तांसाठी अत्यल्प दरात चहाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच आता पूर्व सूचनेनुसार नाश्त्याची सोय करण्यात येते.. इमारतीच्या मागील बाजूस ५० - ६० नारळाच्या झाडांची बाग संस्थेने विकसित केलेली आहे. त्यापासून संस्थेला दरवर्षी उत्पन्न मिळत असते. हे नारळ स्वामी भक्तांच्या भोजन आणि समृद्ध पूजेसाठी उपयोगात आणले जातात. शिवाय या वास्तूच्या बाजूने फुलझाडे आहेत. रोजच्या पूजेसाठी ह्या फुलांचा उपयोग करण्यात येतो. या इमारतीच्या आवारातच संस्थेने गोशाळा सुरु केली आहे. समाधी मंदिरातून भक्तनिवासापर्यंत पायी जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केलेला आहे.