आदिनाथ सिद्ध आदिगुरू थोर ।
त्यासी नमस्कार भक्तिभावें।।१।।
तयाचि पासोनि शिव-शक्ति-बीज।
लाधलें सहज मत्स्येंद्रातें।।२।।
मत्स्येद्राने दिलें गोरक्षा लागोनी ।
गोरक्षें गहिनी धन्य केला।।३।।
गहिनीनाथें बोध केला निवृत्तीसी ।
निवृत्ति उपदेशी ज्ञानदेवा।।४।।
ज्ञानदेव-शिष्य देव, चूडामणि ।
पुढें झाले मुनिगुंडाख्यादि ।।५।।
रामचंद्र महादेव रामचंद्र ।
प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ।।६।।
योगसार ऐसें परंपराप्राप्त ।
सद्गुरू गणनाथ देई मज ।।७।।
स्वामी म्हणे झाले कृतार्थजीवन ।
सद्गुरू चरण उपासितां ।।८।।
आदिनाथांपासून स्वामीस्वरूपानंदांपर्यंत ज्या परंपरेने हा संप्रदाय आला त्या व्यक्तींबद्दल अगदी थोडक्यात माहिती आपण पाहू.
१) आदिनाथ -
आदिनाथ हे सकळ सिद्धांचेगुरु म्हणून ज्ञानोबांनी गौरविले आहेत. आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर. हे सर्वांचे आदिगुरु . यांच्यापासून हा संप्रदाय पुढे आला. शंकरांनी एकांत स्थानी पार्वतीला जो उपदेश केला तो त्यावेळी क्षीरसागराच्या कल्लोळात एका मत्स्योदरात असणाऱ्या कवी नारायणाचे कानी पडला. त्यामुळे त्याला शुद्ध ज्ञान झाले व तोब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर त्या मच्छीच्या गर्भातून ध्वनी आला की, "सर्वब्रह्मरूप आहे." हा ध्वनी ऐकताच शंकरांनी तिकडे पहिले तर त्यांच्या लक्षात आले की त्या मच्छीच्या उदरात नऊ नारायणा पैकी कवी नारायणाने संचार केला आहे. भगवान शंकर त्या कवी नारायणाला म्हणाले की "तूं माझा उपदेश ऐकल्याने तुला ज्ञान प्राप्त झाले आहे. परंतु तू बदरिकाश्रमास ये. तेथे दत्तात्रेयांकडून हाच उपदेश मी तुला करवेन व मी तुला दर्शन देईन." मच्छीच्या पोटातून सुंदर बालक जन्माला आले. त्याच वेळी कामिक नावाच्या कोळ्याने त्या बाळाला पहिले. त्या बाळाला पाहून त्या कोळ्याचे अंतःकरण द्रवले. इतक्यात दैवी वाणी त्याच्या कानी आली -"हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकाला घरी नेऊन याचा नीट सांभाळ कर. याचे नाव 'मच्छिंद्रनाथ' असे ठेव."
एका मच्छीच्या पोटातून जन्मलेल्या सुंदर बालकाचा कामिक कोळ्याने पाच वर्षे पुत्राप्रमाणे सांभाळ केला. आकाश वाणी प्रमाणे कोळ्याने त्या मुलाचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेवले. एकदा तो कोळी मासे पकडत असता आपल्या मातृकुळाचे रक्षण करावे असे मच्छिंद्रनाथांना वाटले आणि कोळ्याने पकडलेले सर्व मासे त्याने पाण्यात सोडले. त्यामुळे कोळी चिडून त्या मुलाला बोलला. म्हणून मच्छिंद्रनाथ बापाची नजर चुकवून तिथून निघाले. फिरतफिरत बदरिकाश्रमात गेले. तिथे १२ वर्षे तपश्चर्या करून तेथे दत्तात्रेयांचा अनुग्रह घेऊन भगवान शंकराच्या दर्शनाने मच्छिंद्रनाथ कृतार्थ झाले. सर्व सिद्धी हस्तगत झाल्या आणि मच्छिंद्रनाथ तेथूनच तीर्थयात्रेला गेले.
मच्छिंद्रनाथ फिरत फिरत बंगालमधील चंद्रगिरी गावात आले. तेथे सर्वोदयपाल नावाचा ब्राह्मण आपल्या सरस्वती नावाच्या पत्नीसोबत राहत होता. पण त्यांना संतती नव्हती. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत भिक्षेसाठी त्यांच्या दारात आले तेव्हा सरस्वतीने आदराने मच्छिंद्रनाथांना भिक्षा वाढून आपले दुःख सांगितले. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी तिला सूर्यमंत्राने मंत्रित विभूती दिली आणि ते भस्म निजताना खाण्यास सांगितले.तुला सूर्याप्रमाणे तेजस्वी पुत्र होईल आणि त्यास बारा वर्षांनी मी येऊन उपदेश करीन." असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले. घडल्या प्रकाराने आनंदित झालेल्या सरस्वतीबाईने अत्यंत आनंदाने ही वार्ता शेजारणीला सांगितली. पण शेजारणीच्या बोलण्याने मनात विकल्प आला आणि सरस्वतीबाईंनी ते भस्म उकिरड्याच्या खड्ड्यात टाकले.
बोलल्याप्रमाणे बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले आणि सरस्वती बाईंकडे मुलाची पृच्छा केली.तेव्हा सरस्वती बाईंनी मुलगा झाला नाही असे सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्या भस्माचे काय केले असे विचारताच सरस्वती बाई घाबरल्या. त्यांनी नाथांच्या पाया पडून घडली हकीकत सांगितली आणि नाथांच्या इच्छेनुसार त्यांना भस्म टाकलेली जागा दाखवली. त्या जागेवर जाताच मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला उद्देशून हाक मारली."हे प्रतापी हरिनारायण सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर निघ, तुझे नाव गोरक्ष ठेवले आहे. तेव्हा त्या मुलाने आतून आवाज दिला. आतून मुलाचा आवाज ऐकून मच्छिंद्रनाथांनी गोवराची रास उकरून त्या मुलाला बाहेर काढले. तो तेजःपुंज मुलगा बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. त्या मुलाला पाहून सरस्वतीबाईंना पश्चात्ताप झाला. मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाच्या मस्तकावर वरदहस्त ठेऊन त्याला नाथ पंथाची दीक्षा दिली आणि ते मुलाला आपल्यासोबत तीर्थयात्रेला घेऊन गेले.
या संप्रदायातील चौथे पुरुष म्हणजे गहिनीनाथ होत. यांची उत्पत्ती मोठी विचित्र आणि आश्चर्यजनक आहे. एके दिवशी एका गावात गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्र पाठ करीत होते. त्यावेळी चिखलाच्या गोळ्यांनी खेळत असलेली काही मुले त्यांच्या जवळ आली. त्यांनी चिखलाची एक गाडी तयार केली व त्यावर बसण्यासाठी चिखलाचाच गाडीवान तयार करू लागले. त्या मुलांना गाडीवान करता येईना म्हणून त्यांनी गोरक्षनाथांना गाडीवान तयार करून देण्यास सांगितले. गोरक्षनाथ चिखलापासून जो पुतळा तयार करतील त्यापासून गहिनीनाथांचा अवतार व्हायचा होता. तसा संकेतच होता. गहिनीनाथ म्हणजे नवनारायणांपैकी करभंजन होत. तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ करतच गोरक्षनाथांनी पुतळा तयार केला. पुतळा तयार झाल्याबरोबर करभंजनाने त्या पुतळ्यात प्रवेश केला.त्याबरोबर तो पुतळा तेजःपुंज दिसू लागला आणि त्याने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. पण मुले मात्र भूत आहे म्हणून पळून गेली. गोरक्षनाथ पण अचंबित झाले. पण मच्छिंद्रनाथांना हा वृत्तांत कळताच मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला उचलून घेतले. हा मुलगा अवतारी आहे असे सांगितले आणि त्याला एका बाईच्या हवाली सोपवले. बारा वर्षांनी गोरक्षनाथ पुन्हा त्या ठिकाणी गेले. त्यांनी गहिनीनाथांना अनुग्रह दिला व गहिनीनाथ सिद्धपुरुष झाले. हेच निवृत्तीनाथांचे गुरु होत.
यांच्याबद्दल माहित नाही असे फार क्वचित घडेल. गहिनीनाथांचे शिष्य आणि ज्ञानेश्वरांचे गुरु. यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत. हे मूळ आपेगावचे कुलकर्णी. फिरत फिरत आळंदीला आले. तेथे सिद्धोपंत यांच्या मुलीशी, रुक्मिणी हिच्याशी विवाह केला. पण विवाहानंतर विरक्तीमुळे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. काशीला रामानंद नावाच्या थोर संन्यासी व्यक्तीकडून संन्यास दीक्षा घेतली. आपले पती परत येतील या आशेने रुक्मिणीबाई भजन, नामस्मरण, पिंपळाला प्रदक्षिणा यात दिवस घालवू लागल्या. एकदा रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत आळंदीला आले. तेव्हा रामानंदस्वामींना रुक्मिणीबाईंची कथा कळली व आपल्या आश्रमात राहणारे विठ्ठलपंत हेच यांचे पती आहेत असे रामानंद स्वामींच्या लक्षात आले. त्यामुळे रामानंद स्वामींनी परत काशीस आश्रमात जाऊन विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम ग्रहण करण्यास सांगितले. गुरूंच्या आज्ञेने लोकनिंदेची तमा न बाळगता विठ्ठलपंत परत आले व त्यांनी गृहस्थाश्रम ग्रहण केला. पण त्यांच्या या कृतीमुळे आळंदीवासियांनी विठ्ठलपंतांवर बहिष्कार घातला.त्यानंतर विठ्ठलपंतांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. मुलांच्या अलौकिक गुणांमुळे मुलांचे शुद्धीकरण करून घेऊन त्यांच्या मुंजी कराव्या अशी विठ्ठलपंतांनी ब्रह्मवृंदाला विनंती केली. पण त्या ब्रह्मवृंदाने विठ्ठलपंत यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले.त्यानंतर ते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गेले.तेथे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करीत असताना निवृत्तीनाथांना एक वाघ मागे लागलेला दिसला. म्हणून ते पळत एका गुहेत शिरले. तेथे गहिनीनाथ ध्यानस्थ होते. निवृत्तीनाथ आलेले कळताच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. निवृत्तीनाथांना तात्काळ ब्रह्मबोध झाला. ते स्थिर झाले व कृतार्थ होऊन ते गुहेतून बाहेर पडले. त्यानंतर विठ्ठलपंतासह सर्वजण आळंदीस परतले.आळंदी येथे पुन्हा एकदा ब्रम्हसभा भरली त्यात श्रीक्षेत्र पैठणहून आलेले एक विद्वान शास्त्री होते.त्यांनी विठ्ठलपंतास दिलेली देहांत प्रायश्चिताची शिक्षा कायम केली.त्याप्रमाणे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या दोघांनी काशी जवळील प्रयाग क्षेत्री गंगा नदीत देह समर्पित केले.त्यानंतर संन्याशाची मुले म्हणून होणारी अवहेलना आणि अत्यंत कष्टप्रद जीवन या चारही मुलांच्या वाट्याला आले. तरीही निवृत्तीनाथ शांतच होते. त्या सर्वांना पैठणच्या ब्रह्मवृंदाकडून शुध्दीपत्र आणल्यानंतरच मुंज करू असे सांगण्यात आले. म्हणून चारही भावंडे पैठणला जाण्यास निघाली.पैठण येथे ब्रह्मसभा चालू असताना ज्ञानेश्वरांनी आत्मा सर्वत्र एकच आहे याचा प्रत्यय दाखविण्यासाठी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार केला. आणि त्यांचा अधिकार जाणून त्यांना शुद्धिपत्र देण्यात आले.नंतर निवृत्तीनाथांच्या अनुमतीने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई यांच्या समाधी नंतर सर्वात शेवटी त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले.
निवृत्तीनाथांचे कनिष्ठ बंधू. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या दाम्पत्याचे द्वितीय पुत्र. कृष्णजन्माष्टमीला कृष्णजन्माच्या वेळेलाच ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. आई-वडिलांच्या देहार्पणानंतर अत्यंत कष्ट या भावंडांच्या वाट्याला आले. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथाकडून अनुग्रह प्राप्त झाल्या नंतर ज्ञानेश्वरांनी आपली लहान भावंडे सोपान आणि मुक्ताबाई यांना अनुग्रह दिला. पैठणच्या ब्रह्मवृंदांच्या सभेत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवून दाखवले. नंतर नेवासे येथे भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका हा टीकाग्रंथ म्हणजे भाष्य लिहिले. भव्य, दिव्यचरित्र असणाऱ्या ज्ञानेश्वरांनी सुमारे ४०० वर्षे नंतर देवनाथांना अनुग्रह दिला.आळंदीला ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली.
देवनाथ महाराज मूळ गुजरात मधील बलसाडचे रहाणारे. त्यांचे नाव शिवदेव भगत.त्यांचा सराफीचा व्यवसाय. ते देवीचे उपासक होते. त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि परमार्थ साध्य करायचा असेल तर आळंदीस श्री ज्ञानेश्वर महाराजांंस शरण जावे असा आदेश झाला.त्यानुसार ते महाराष्ट्रात आळंदीस आले.वारकरी मंडळीच्या सहवासात राहून मराठी भाषा शिकून ज्ञानेश्वरीची पारायणे सुरु केली,परंतु अर्थाचे आकलन होत नाही आणि श्री ज्ञानेश्वरांचे दर्शनहि होत नाही याचा खेद वाटून त्यांनी आपली जीभ कापून ग्रंथावर ठेवली.तत्क्षणी श्री ज्ञानेश्वर महाराज प्रकट होऊन त्यांनी ती जीभ पुर्ववत करून नेवासे येथे जाऊन पारायणे करावीत असा आदेश दिला.त्याप्रमाणे शिवदेव नेवासे येथे आले व तेथे पारायणे केली आणि त्यांची निष्ठा पाहून साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन देवनाथांच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. व परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला,अशाप्रकारे देवनाथांना पूर्णबोध झाला आणि परंपरा पुढे सुरु झाली. ज्ञानेश्वरांच्या नंतर किमान चारशे ते पाचशे वर्षांनी देवनाथांचा जन्म झाला असावा. पण नक्की वर्ष सापडत नाही. नंतर ते काशी येथे गेले व तिथेच राहू लागले.चूडामणी यांना काशी क्षेत्री अनुग्रह दिल्यानंतर ते बद्रिकाश्रमी निघुन गेले.त्यानंतरचा त्यांचा इतिहास अज्ञात असल्यामुळे त्यांची समाधी कोठेही आढळत नाही.किंवा त्याविषयी कोणताही अधिकृत कागदोपत्री पुरावा नाही.
यांचे मूळ गाव देगलूर.ते शंकर भक्त होते.प्रतिवर्षी ते सहकुटुंब व सहपरिवार काशीविश्वेश्वराच्या दर्शनास श्रीक्षेत्र काशीस जात असत.शंकर भक्तीमुळे त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या.एकेप्रसंगी काशीस जात असताना एका वटवृक्षावरील ब्रम्हसमंधास त्यांनी सद्गती दिली.त्यांच्या मातापित्यांना काशीस मृत्यु यावा अशी इच्छा होती.त्याप्रमाणे काशीतच त्यांचा मृत्यु झाला.त्या मुक्कामात चूडामणी यांना श्री देवनाथ यांचेकडून अनुग्रह घेण्याची काशी विश्वेश्वराची आज्ञा झाली.त्याच वेळी काशीस असलेल्या देवनाथानाही चूडामणीस अनुग्रह देण्याचा आदेश झाला.परस्परांची भेट होताच देवनाथानी चूडामणी यास अनुग्रह देऊन संप्रदाय पुढे चालविण्याची आज्ञा केली.त्यासंदर्भात श्री चूडामणी ह्यांचा पुढील प्रमाणे अभंग आहे. देवनाथ गुरु धन्य । सकल सुरासुर मान्य । ध्यानी सुंदर ती मूर्ती । ज्याची त्रैैलोक्यात कीर्ती । तोची द्या महा सिंधू । माझा स्वामी दीनबंधू । धन्य क्षेत्र महा काशी । गुरु माझा स्वप्रकाशी । जेणे तेथे विठ्ठल दिला । चूडामणी सफल केला । तसेच, देवनाथा ऐसा गुरु । असता मी कांं चिंता करू । ज्ञानेश्वर सद्गुरु सखे । येउनी बोधिती ज्या स्वमुखे । ज्ञानेश्वरी पारायण । हेच ज्यांचे अनुष्ठान । देवनाथांचे चरणी । चुडा जाय लोटांगणी । चूडामणी यांना अनुग्रह देऊन देवनाथ महाराज बद्रिकाश्रमी निघुन गेले .याविषयी जुने टिपण धुळे येथील कै.शंकरराव देव यांच्या सत्कार्योत्तेजक सभा ह्या संस्थेच्या जुन्या बाडात आढळते. तसेच देगलुर येथील श्री गुंडमहाराजांच्या मठातील गादीवरील विद्यमान अधिकारी श्री चंद्रशेखर महाराज यांचे संग्रही आढळते. हैद्राबादेचा दुसरा निजाम याने त्यांचे दर्शन घेऊन त्यांना देगलूर जवळील मुक्रमाबाद या गावाची जहागिरीची सनद दिली होती.चूडामणी महाराज हे संगीतज्ञ ,गायक व ज्योतिष शास्त्रात पारंगत होते .त्यांची समाधी देगलूर येथील श्री गुंडमहाराज यांचे मठात आहे.
१०) गुंडा महाराज -.
देगलूर जवळील उदगीर गावी गोविंद नाईक नावाचे सराफ होते. त्यांचाच मुलगा गुंडा. हे चूडामणी महाराजांकडे धर्मशिक्षणासाठी राहत होते. चूडामणी महाराजांच्या सहवासाने गुंडोजी यांना परमार्थाची ओढ लागली. शिष्याची उत्तम मुमुक्षु दशा पाहून चूडामणीमहाराजांनी गुंडोजी यांना अनुग्रह दिला. नंतर चूडामणी महाराजांनी आपली मुलगी राजाक्का हिला गुंडोजी यांना देऊन त्यांना घरजावई करून घेतले. उत्तम प्रपंच करून परमार्थ करण्याची हातोटी त्यांना प्राप्त झाली असल्याने उत्तम प्रपंच करून गुंडोजी यांनी गुरूंच्या आज्ञेने आपला संप्रदाय पुढे सुरु ठेवला.पुढील काळात ते पंढरपूर येथेच स्थायिक झाले.आणि नित्य ज्ञानेश्वरी वाचन, देवदर्शन व प्रवचन करत ते कालक्रमणा करू लागले.दुसऱ्या बाजीरावांनी त्यांची कीर्ती ऐकून पंढरपूरला येऊन गुंडामहाराज यांचे दर्शन घेतले व त्यांना आपले राज्य चंद्रसूर्य असेपर्यंत टिकावे अशी प्रार्थना केली.तथापि श्री गुंडामहाराज यांनी सांगितले कि, मी असे पर्यंत तुझे राज्य राहील त्याप्रमाणे इ.सन.१८१७ साली गुंडामहाराज समाधिस्थ झाले व त्यानंतर इ.स.१८१८ साली पेशवाई समाप्त झाली.गुंडामहाराज यांच्या अभंगांची रचना विपुल असून ती अप्रकाशित आहे. त्यांची समाधि पंढरपूर क्षेत्री वाळवंटात आहे.
११) रामचंद्रमहाराज -
गुंडोजीबुवांचे सत्शिष्य रामचंद्रबुवा यांनी ही परंपरा पुढे चालू ठेऊन अनेकांचा उद्धार केला. हे नागपूरच्या श्रीमंत भोसले सरकारचे वकील म्हणून पेशवे दरबारी आले. श्री. रामचंद्रबुवाबुटी या नावाने ते प्रसिद्ध होते. अधिकाराच्या जागेवर असूनही पारमार्थिकदृष्ट्याही खरी अधिकारी व्यक्ती होती. दुसरे बाजीराव पेशवे यांच्यासोबत रामचंद्रबुवाबुटी हे सुद्धा गुंडोजी महाराजांच्याकडे येत असत. नंतर गुंडोजी महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर रामचंद्र महाराज पेशवे दरबारातून निवृत्त होऊन नागपुरास परत गेले व तेथे ईश्वरचिंतनात कालक्रमणा करून थोर योग्यतेस चढले आणि गुरूंच्या आज्ञेने हा संप्रदाय पुढे सुरु ठेवला. नागपूर येथे व्हरायटी चौकापुढील झांशी चौक भागातील गोवारी पुलाजवळ रामचंद्र महाराज यांचा वाडा असून त्याचे मागील अंगणात त्यांची समाधी आहे.रामचंद्र महाराज यांनी गिरनार पर्वतावर तपश्चर्या केल्यानंतर श्री चूडामणी महाराज यांनी प्रकट होऊन त्यांना बोध दिल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो.
१२) महादेवनाथमहाराज -
हे गुंडामहाराज यांचे अनुग्रहित म्हणजे रामचंद्र महाराजांचे गुरुबंधू होते.ते नागपूरचे रहाणारे होते.त्यांनी रामचंद्र महाराजबुटी यांची अध्यात्मिक अवस्था पाहून त्यांना स्वत:स बोध करून देण्याची प्रार्थना केली.त्यानुसार रामचंद्र महाराज यांनी महादेवनाथ यांना तत्वबोध करून दिला व संप्रदाय पुढे चालविण्याची आज्ञा केली. रामचंद्र महाराजांनी समाधी घेतल्यानंतर महादेवनाथ महाराज दक्षिणेला कृष्णातीरी वहे बोरगाव येथे रामलिंग क्षेत्रास येऊन तपश्चर्या करू लागले. माधुकरी मागून नदीतील टेकडीवरील गुहेत महादेवनाथ राहत होते. एकदा १८५४ मध्ये कृष्णेच्या महापुरात भूतनदी आली. ती अचानक आल्यामुळे महादेवनाथ महाराजांना गुहेतून बाहेर पडता आले नाही, ते गुहेतच राहिले. त्यामुळे गावातील लोकांना वाटले की बुवा वाहून गेले. पुराचे पाणी ओसरल्यावर गावातील लोक गुहेत महाराजांच्या शोधात गेले. गुहा उकरून पहिली असता महादेवनाथ समाधिस्थ बसलेले दिसले. त्यामुळे लोकांना बुवांची योग्यता कळली. तासगाव चिंचणीच्या पटवर्धन जहागीरदारांच्या वृद्ध मातोश्रींना बुवांनी अनुग्रह दिला आणि पटवर्धन मातोश्रींच्या विनंतीने महादेवनाथ चिंचणी येथे जाऊन राहिले. नंतर महादेवनाथांनी चिंचणी येथेच समाधी घेतली. चिंचणी येथे त्यांचे मोठे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.
हे मूळचे पुण्याकडील राहणारे. ते कुरुंदवाड संस्थानात नोकरीस होते. नंतर ते उपरती होऊन गाणगापुरास जाऊन सद्गुरुप्राप्तीसाठी गुरुचरित्राचे सप्ताह करू लागले. तेथे झालेल्या श्रीगुरुमूर्तींच्या दृष्टांताने ते वहे बोरगाव येथे आले. तेथे महादेवनाथ यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. त्यानंतर रामचंद्र महाराज बरेच दिवस चिंचणी येथे गुरुसेवा करीत राहत होते. नंतर गुरूंच्या आज्ञेने रामचंद्र महाराज परत कुरुंदवाडला गेले. रामचंद्रमहाराजांच्या पात्रतेचे दाखले लोकांना मिळू लागल्यावर त्यांची कीर्ती कुरुंदवाड संस्थानच्या जहागीरदारवाड्यात गेली. जहागीरदारांनी रामचंद्रमहाराज यांचा अनुग्रह घेऊन त्यांच्या योगक्षेमासाठी विजापूर जिल्ह्यात तिकोटे ह्यागावी पागेवर अंमलदार म्हणून नेमून घेतले. तिथे जमीन, वाडा दिला. रामचंद्र महाराज यांची कन्या गुंडाक्का ही सुद्धा योगिनी होती. तिचा संप्रदाय पुढे सुरु आहे. तिकोटेकर महाराजांचा शिष्यपरिवार फारच मोठा होता. तिकोटेकर महाराज दरसाल चातुर्मासात कोल्हापुरात येत असत. तेथे ज्या लोकांना रामचंद्र महाराज अनुग्रह देत असत त्यांच्या नावे एक शिवलिंग स्थापन केले जाई. अशी १०८ शिवलिंगे असून त्याखाली अनुग्रहितांची नावे कोरलेली आहेत. रामचंद्र महाराज तिकोटेकर यांनी तिकोटे या गावीच समाधी घेतली.आदिनाथांपासून रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापर्यंत झालेल्या सुमारे ११ नाथसिद्धांच्या चरित्राचे वर्णन करणारा हा ओवीबध्द सिद्धचरित्र ग्रंथ त्यांनीच कोल्हापूर येथील त्यांच्या श्रीपतीनाथ नावाच्या शिष्याकडून इ.स.१८८३ मध्ये तयार करून घेतला.या ग्रंथात काही अध्याय योगिनी गुंडाक्का यांनी लिहिलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपतीनाथ यांनी सिद्धचरित्र या ग्रंथाची रचना केली.
रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचे हे शिष्य. कोल्हापूर पासून सुमारे १८ किलोमीटर असणाऱ्या वडगाव या गावात शके १७६५ ( इ.स.१८४३ ) साली विश्वनाथ महाराजांचा जन्म झाला. बालवयातच पंढरपूरला राहण्याचा योग आला. त्यामुळे पांडुरंगाचे दर्शन, संतांचा सहवास लाभल्याने बालवयातच त्यांना परमार्थाची ओढ लागली. पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्यानंतर त्यांना वैराग्य निर्माण झाले त्यामुळे त्यांनी पुढे प्रपंचाचे पाश जोडले नाहीत. तारुण्यातच रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचा अनुग्रह झाला. त्यामुळे विश्वनाथ महाराज स्व-स्वरूपानुसंधानात मग्न असायचे. रुकडी येथील प्रिय शिष्य कुलकर्णी यांच्याकडेच ते राहू लागले. ४० वर्षे रुकडी येथे वास्तव्य झाल्याने सर्वजण त्यांना रुकडीकर असे ओळखू लागले. रामचंद्र महाराज वर्षातून एक महिना रुकडी येथे येत असत. तो सोहळा अवर्णनीय असे. शिवाय वर्षातून एकदा ज्ञानेश्वरीचा सप्ताह केला जाई. गणेशनाथ महाराज हे विश्वनाथ महाराजांचे पट्टशिष्य. गणेशनाथांच्या आमंत्रणावरून विश्वनाथ महाराजांनी अनेक शिष्यांसह पुण्यास जाऊन ज्ञानेश्वरीचा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला. नंतर १९१८ मध्ये विश्वनाथ महाराजांची तब्येत खूप खालावली. माघ शुद्ध ३ शके १९४० रोजी विश्वनाथ महाराजांनी आपला सर्व परिवार जवळ बोलावून भाऊसाहेब रुकडीकर यांना परंपरा चालवण्याचा अधिकार देऊन दुपारी १२ वाजता ते ब्रह्मीभूत झाले. तेथे पंचगंगा नदीच्या काठी जेथे महाराजांचा दहन विधी झाला तेथेच त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. तेथे नित्य पूजा-अर्चा केली जाते. कोल्हापूर येथे भाऊसाहेब रुकडीकर यांचा बराच मोठा शिष्यवर्ग आहे.
हेच स्वामी स्वरूपानंद यांचे सद्गुरू. बाबांचे वडील पुण्यातल्या खेड जिल्ह्यातील चाकण गावचे. त्यांचे मूळ आडनाव मटंगे. पण ते पुण्यास येऊन वैद्यकी व्यवसाय करू लागल्यामुळे त्यांनी वैद्य असे आडनाव धारण केले. बाबांचे शिक्षणही पुण्यास झाले. बाबा सुरुवातीला राणीबेन्नूर येथे पी.डब्लू.डी. मध्ये नोकरी करून नंतर रेल्वेमध्ये नोकरी करू लागले. बाबांची एकूण चार लग्ने झाली. पण अपत्यसुख नाही म्हणून बाबा दुःखी होते. रेल्वे मध्ये काम करत असताना कोल्हापूर - मिरज रेल्वेचे काम सुरु असताना बाबांची रुकडी येथे इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी विश्वनाथ महाराज रुकडी येथे राहत होते. बाबासुद्धा कामाच्या निमित्ताने रुकडी येथे राहत होते. त्यामुळे रिकाम्या वेळेत बाबा विश्वनाथमहाराजांकडे जात असत. हळू हळू महाराजांवर बाबांची श्रद्धा बसून ती वाढू लागली. त्याचवेळी बाबांना चार मुलगे झाले. महाराजांच्या कृपेने आपल्या संसाराची घडी नीट बसली म्हणून बाबांची महाराजांवर अधिकच श्रद्धा वाढली. पाच वर्षाच्या गाढ परिचयानंतर इ.स. १८९० च्या सुमारास विश्वनाथ महाराजांचा अनुग्रह घेतला. काम संपल्यावर बाबा पुण्यास परत आले तरी वर्षातून काही दिवस बाबा रुकडी येथे सद्गुरू सहवासात जाऊन राहत असत. विश्वनाथ महाराजांची एक आरती गणेशनाथ महाराजांनी रचलेली आहे. ती आजही गायली जाते.
सन १९१२ पासून गुरुआज्ञेने बाबा अनुग्रह देऊ लागले. बाबांचा शिष्य परिवार वाढू लागला. बाबांचे सर्व चिरंजीव उत्तम प्रकारे स्थिर झाले. सेवा निवृत्तीनंतर वयाच्या ७८ वर्षापर्यंत बाबामहाराज पुण्यातच राहत होते. तेथेच बाबांचे प्रिय शिष्य केशवराव गोखले एक दिवस रामचंद्र गोडबोले ऊर्फ स्वामी स्वरूपानंद यांना घेऊन आले आणि हा दैवी शिष्य पाहून बाबांना आनंद झाला. त्यांना बाबामहाराजांनी अनुग्रह दिला. बाबामहाराज ज्ञानेश्वरीव्यतिरिक्त इतर ग्रंथ सहसा वाचत नसत. पण त्यांची प्रत जीर्ण झालेली असल्यामुळेस्वामी स्वरूपानंदांनी स्वतः ज्ञानेश्वरी लिहून त्याची प्रत बाबामहाराजांना अर्पणकेली.
बाबांचा स्वभाव शिस्तप्रिय होता. परमार्थात श्रद्धा महत्वाची असे त्यांचे मत होते.तार्किकपणाचा त्यांना तिटकारा होता. एखाद्या वेळी प्रेमाने पोथी सांगत असताना कोणी तार्किक व्यक्ती आली तरी बाबामहाराज पोथी बंद करीत असत. बाबांना ७८ वे वर्ष लागले तसे वयोमानाप्रमाणे त्यांचे शरीर क्षीण होऊ लागले.पौष शु.११ शके १८५५ (इ.स.१९३३ ) रोजी बाबामहाराजांचे निर्याण झाले.
१६) स्वामी स्वरूपानंद-
बाबामहाराज वैद्य उर्फ गणेशनाथ यांचे शिष्य स्वामी स्वरूपानंद यांची गुरुभक्ती तसेच त्यांनी केलेली गुरुसेवा इत्यादी सुरुवातीसच त्यांचे चरित्रात दिलेली आहेच.
(जन्म दि.१५ डिसेंबर १९०३ - महासमाधी दिनांक १५ ऑगस्ट १९७४ )