सन १९७३ पासून कै. बापूसाहेब चाफळकर यांच्याप्रेरणेने तरडगाव ते पंढरपूर असा दिंडी सोहळा सुरु आहे. गेली ४५ वर्षे चालत असलेलाहा सोहळा कै. बापूसाहेब चाफळकर यांच्या पश्चात श्री. वामनराव तथा मामासाहेब घळसासी यांनी स्वामी स्वरूपानंद भक्त मंडळी आणि वारकरी यांच्या सहकार्याने चालू ठेवला आहे. या दिंडीमध्ये प.पू. स्वामींच्या वाङ्मय प्रचाराच्या कार्याला वारकरी भक्तांकडून अलोट प्रतिसाद मिळत आहे. वारकरी भक्तांत वाढत असणारी अभंग ज्ञानेश्वरीची आवड पाहून संस्थेतर्फे या वारीमध्ये अभंग ज्ञानेश्वरीच्या विक्रीसाठी स्वतंत्र टेम्पोची व्यवस्था करण्यात येते. आषाढी एकादशीच्या दिवशी माउलींच्या पादुका पंढरपूर नगरीत प्रवेश करीत असताना संस्थेतर्फे माउलींना हार अर्पण करण्यात येतो. तेथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे प.पू.स्वामींना हार अर्पण केला जातो. हा सोहळा अपूर्व असा असतो. यादिंडीला संस्थेतर्फे सर्व औषधांनी युक्त असा बॉक्स आणि सर्व आर्थिक मदत केली जाते.
तसेच २००३ पासून कोल्हापूर येथील स्वामीभक्त श्री.कैलास माने यांच्या पुढाकाराने स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षांपासून पावस ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळा केला जातो. १०० पेक्षा जास्त भक्त या दिंडीत सहभागी होतात. कोकणातील पाऊस, घाटातील धुके यांची तमा न बाळगता हा दिंडी सोहळा सातत्याने सुरु आहे. याही दिंडीला संस्थेतर्फे सर्व औषधांनीयुक्त असा बॉक्स आणि सर्व आर्थिक मदत केली जाते.