मंदिर - शिखर आणि कळस

श्रीमत् स्वामी स्वरूपानंद महाराज दि. १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधिस्थ झाले. श्री स्वामीजींनी त्यापूर्वी लिहून ठेवल्याप्रमाणे समाधीची जागा त्यांच्या जन्मगृहाजवळच तयार करण्यात आली. श्रीमत् स्वामीजींनी लिहून दिलेल्या मोजमापानुसार तयार करण्यात आलेल्या गर्तेत दि. १६ ऑगस्ट १९७४ रोजी श्रीमत्स्वामीजींचा देह भूगर्भ समाधिस्थ करण्यात आला. ही संजीवन समाधी आहे. ह्या जागी नंतर भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. मंदिराचा आराखडा (प्लॅन) कै. भाऊराव देसाई यांचे पुतणे श्री. केशवराव देसाई, आर्किटेक्ट आणि श्री. पंचवाघ,कोल्हापूर यांनी तयार केला आहे. विशेष म्हणजे धर्मसिंधू ग्रंथातील मापाप्रमाणे तो सहजच साधला आहे. समाधी मंदिर अष्टकोनी आहे. त्याची पायाभरणी स्वामीभक्त वै. मामा पडवळ (वेंगुर्ला) यांच्या शुभहस्ते झाली.

मंदिरावर सुमारे पासष्ट फूट उंचीचे भव्य शिखर असून त्यावर पाच फुट उंचीचा व ११० किलो वजनाचा तांब्याचा कळस व ध्वज बसविलेला आहे. या कळसावर भक्तांनी दिलेल्या सोन्याचा मुलामा केलेला आहे. कळस स्थापना दि. १८ डिसेंबर १९७६ रोजी (जन्मोत्सव दिनी) कै. अच्युतराव पटवर्धन यांचे हस्ते झाली. हा कळस श्री. बी. व्ही. सब्बनावार यांनी बनवला आणि त्यावर सोने चढवण्याचे काम श्री. पेठे यांनी केले. कळस करून आणण्याचे काम कै.अण्णा गोडबोले (सांगली) यांनी केले. या मंदिरवास्तूच्या बांधकामावर कै. भाऊरावजी देसाई ह्यांनी अत्यंत आत्मीयतेने व तळमळीने प्रत्यक्ष देखरेख केली आणि श्री.शांतीलाल सोमपुरा  ह्यांच्याकडून ते पूर्ण करून घेतले. श्री. स्वामीजींचे पुतणे कै. शिवराम गणेश गोडबोले व श्री. बाळकृष्ण गणेश गोडबोले यांनी त्यांचे घर (म्हणजे स्वामीजींचे जन्मगृह) व त्या सभोवतालची जागा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ संस्थेस निरंतर कराराने दिलेली आहे.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना