अनंत निवास

स्वामींच्या १९३४ ते १९७४ अशा ४० वर्षांच्या वास्तव्याने पुनीत झालेली अनंत निवासाची ही वास्तू. यावास्तूत प्रवेश करतानाच डावीकडे स्वामींची खोली आहे. स्वामींच्या खोलीमध्ये स्वामींचा पलंग,त्यावरील गादी आणि बाजूच्या भिंतीवर स्वामींनी लावलेले स्वामींच्या रोजच्या पूजेतील संतांचे फोटो आणि खिडकीजवळ बेंच आहे. याच बेंचवर स्वामीभक्त २ ते ३ मिनिटे बसून श्रीमत् स्वामीजींची उपदेशपर अमृतवाणी ऐकत असत. पलंगाच्या उशाकडील बाजूस श्रीमत् स्वामीजींचे सद्गुरू श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांची मूर्ती प.पू.स्वामी असताना जशी होती तशीच राखण्यात आलेली आहे. येथे स्वामींचे चैतन्य स्वरूपात अखंड वास्तव्य आहेच. त्यामुळे ह्या खोलीमध्ये अखंड नंदादीप तेवत असतो. याच खोलीत स्वामींना श्री महाविष्णूंचे प्रत्यक्ष सगुण दर्शन झाले. श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी, श्रीभावार्थगीता, श्रीअभंग अमृतानुभव, संजीवनी गाथा इत्यादी प्रासादिक ग्रंथांच्या लेखनाचे कार्यही याच खोलीत संपन्न झाले. स्वामींनी अनेक भक्तांना अनुग्रह सुद्धा याच खोलीत दिला. स्वामींच्या दीर्घकाळ वास्तव्याने पवित्र झालेल्या ह्या खोलीचे अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तितकेच महत्त्व आहे. स्वामींनी देहत्यागापूर्वीच पावस येथील आपल्या अखंड वास्तव्याबद्दल लिहून ठेवले आहे.      


"आजकालचे नव्होच  आम्ही. माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं, दिलं काम तिच्याच कृपेनंं पुरं झालं. आता आम्हाला कुठंं नाही जायचं, इथंच आनंदात  रहायचं आणि माउलीनंच अन्यत्र पाठवलं, आणि तिथं अवतीर्ण व्हावंं लागलं तरी आता चैतन्य रूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच."


स्वामींच्या या वचनाप्रमाणे येथे दर्शनास येणाऱ्या भक्तांना स्वामींचे अस्तित्व व पवित्र स्पंदने अजून जाणवतात व अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ होऊन पुढील वाटचाल सुरु होते.येणाऱ्या भाविक भक्तांनी स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अनंत निवासातल्या ह्या खोलीच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. 


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना