अभ्यास हा ज्याचा त्यानेच करावयाचा असतो. अडीअडचणीत मार्ग दाखवता येईल, पण योग्यता प्राप्त झाली नसताना उगाच घाई करून चालत नाही. निदिध्यास, गुरुनिष्ठा, सतत अखंड सोऽहं अनुसंधानात्मक भजन करावे. मग जसजशी प्रगती होईल तसतशी खूण पटू लागेल. गुरुरूपच होऊन भजन करावे. म्हणजे कोणतेही न्यून राहणार नाही. साधनेबद्दलही वृथा अभिमान नसावा.
सोऽहं चे अखंड अनुसंधान ठेवल्यामुळे विश्वाकडे साधकाला अलिप्तपणे पहाता येऊ लागते. अगदी देहपतनाच्यावेळीही कसलेही भय न बाळगता एकदम विलीन होता येते.
वारा नसलेल्या ठिकाणचा दिवा कसा शांत तेवत असतो त्याप्रमाणे अखंड सोऽहं अनुसंधानाने बुद्धी अगदी स्थिर होऊन वृत्तीही अगदी शांत ठेवणे शक्य होते. सर्वच कर्मात, व्यवहारात एक प्रकारची अलिप्तता आपोआपच येते.
काही पंडित लोक नसती काथ्याकूट करून आपआपल्यापरी काहीही शोध-बोध लावोत. आपण आपला अनुभव घट्ट धरून, अद्वैतरूप आनंदरसात डुंबावे ! अनुभवाशिवाय उगाच वाउगी बडबड आपल्याला नको. कोणताही संप्रदाय एकच सद्वस्तु दाखवणार.
स्वतः अनुभव घ्यावा. अनुभवी लोक पाठीशी असले की चकायला होत नाही व निर्णय कायम राहून अचूक ठिकाणी जाता येते. जाण्याचा प्रयत्न मात्र थोडा फार तरी साधकाने सांगितलेल्या मार्गाने केला पाहिजे.
माळ, जप, मृगाजिन, आसन ही साधकास साधकावस्थेत स्थिर करण्याची फक्त साधने. परतत्त्वावर लक्ष अखंड ठेवणे हे मुख्य. बाह्य गोष्टी गौणच !
सतत सोऽहं अनुसंधानात असता, साक्षीवृत्तीने, सतत आनंद भोगता येऊ लागतो. संसाराचे आघात सुलभतेने सहन होऊ लागतात. देवभक्त ऐक्यानंदातच राहतात. उगाच नसत्या चिंता करून आत्मरूपाचा विसर पडू देऊ नये.
भक्त हा ईश्वरापासून वेगळा राहतच नाही. ज्याच्या ठायी सोऽहं भाव अखंडित आहे अशा भक्ताचा तो सोऽहं भावही शेवटी ईश्वराच्याच ठायी तदाकार होऊन सोऽहं वृत्तीही मावळते व तो आत्मरूपच होतो. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान सर्व एकरूपच होते. हीच एकनिष्ठ भक्ती.
ध्यानातून उठल्यावरही सर्व व्यवहार करताना देखील सोऽहं चे अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे बाह्यजगाचे आघात मनावर कमी होतील. साधकाने वर्षातून एखादा महिना जरी गुरुसान्निध्यात सेवा, भजन, साधना केली तरी अकरा महिने साचलेली घाण, मळ धुवून जाऊन स्वस्वरुपी राहण्यास मदत होते. गुरुसान्निध्य साधकावस्थेत काही काळ हवेच.
गुरुनिष्ठा ही कोणत्याही संप्रदायात अत्यंत महत्त्वाची मानलेली आहे. कबीराने म्हटल्याप्रमाणे, हा देहरूपी वस्त्राचा शेला श्री सद्गुरुला सर्वभावे अर्पण करावा, सोऽहंरूपी उभ्या व आडव्या धाग्यांनी हे वस्त्र विणले जाते. जर काही कारणाने विक्षेप येऊन भजनात खंड पडला तर ह्या वस्त्राचे धागे तुटतात, ते परत सांधून घेऊन रोज नित्यनेमाने वस्त्र विणून जीवनयात्रेचे महावस्त्र गुरूस सर्वभावे अर्पण करावे.
दररोज कोठेही असता थोडा वेळ का होईना सोहं ध्यान प्रसन्न चित्ते, भक्तिभावाने करून मग सांसारिक जीवनास सुरुवात करावी. सोऽहंचिंतनाने मनास वाटेल तसे भटकण्यास वावच राहत नाही. सोऽहंसाक्षित्वाने सुखदुःखाचे हेलकावे सहन होऊन आपण संपूर्ण अलिप्त असून देहप्रारब्धानुसार वर्तत आहोत असा खेळ लीलया पाहता येतो. पुढे अभ्यासाने देहाहंता संपूर्ण मावळून आपणच नाना रूपाने नटून सर्वत्र वर्तत आहोत असा पिंड-ब्रह्माण्ड-साम्यभाव अनुभवास येतो.
प्रत्येकाचे मार्ग भिन्नभिन्न असतात पण आपणाला आपल्या गुरूने सांगितलेल्या मार्गानेच त्वरित पल्ला गाठावयाचा आहे. तर तसा प्रयत्न सतत ठेवावा.
सोऽहं अनुसंधान न सुटता सहजपणे त्याचा तोच खेळत आहे असा प्रत्यय घेत मग संसारातील कोणतीही कामे करावीत.
आपण अलिप्तपणे राहून सर्वांचेच कल्याण इच्छावे. कोणाबद्दलही राग, द्वेष, तिरस्कार अशी कोणतीच भावना बाळगू नये. दुसऱ्याच्या दोषाचे चिंतन किंचितही करू नये. दैवगतीने काही घटना घडतात.
नाद, प्रकाश,अनाहतध्वनी ह्यात साक्षित्व अनुभवावे. प्रकाश पाहणारा कोण ? नाद ऐकणारा कोण ? भजनात तल्लीन होता होता साक्षित्वही मावळून केवळ आत्मानंदातच राहावयाचे. हळूहळू नित्यनेमाने 'मी ब्रह्म' ह्या भावाचा आनंद लाभ भोगावयाचा. सिद्धी येवोत अथवा न येवोत, तिकडे लक्ष देण्याचे कारण नाही. किंचितही तत्सबंधी विचार करू नये. अविरत आत्मोद्धाराचीच तळमळ बाळगून वाटचाल करावी.
जो उपाधीत राहून अभ्यासाने उपाधीत सापडत नाही तोच उत्तम साधक. साधी लहान मुलाने कडी वाजवली तरी गुहावासी एकांतप्रिय मनुष्यास खपत नाही व कार्ट्या असा शब्द ज्याच्या तोंडून निघतो तो कसला साधक ? तोच उपाधीत राहून त्या बालकाशी तादात्म्य होऊन, त्याच्या कृतीचा अर्थशुद्ध स्वरूपात पाहील तर तो त्या बालकाप्रमाणेच आनंद भोगून रागावणार नाही.
सर्वच ईश्वराचे करणे हे एकदा पाहण्याचे अंगवळणी पडले की सदोदित ईश्वरानंदच भोगता येतो. आपण श्रद्धेने सर्वत्र ईश्वर पाहण्यास शिकलो की कोणत्याही परिस्थितीत आनंद टिकून राहतो.
आपली ओळख झाली म्हणजे देवाचीही ओळख होते. आपणाहून देव वेगळा नाही व देवाहून आपण वेगळे नाही. अभेद्याचा प्रत्यय येणे यालाच "भक्ति" असे नाव आहे. विभक्त नव्हे तो भक्त.
अहं स्फुरण कोठून उद्भवते याचा शोध घ्यावा लागतो. मन विषयातून निवृत्त करून अंतरी स्थिर करावे लागते. पुढे विवेक आणि वैराग्य ह्याचा अभ्यास सहजतेने होतो आणि मन शांत होते.
परमार्थ म्हणजे अखंडप्रसन्नता, परमशांती, ह्या परमशांत अवस्थेत साधक सोऽहं ध्यानाने परमात्मरूपाशी समरस होऊन त्याला ह्या विश्वाच्या दृश्य पसाऱ्यात आपणच ओतप्रोत भरून राहिलो आहोत विश्वरूपाने आपणच नटून राहिलो आहो असा प्रत्यय येतो व तो सुख-दुःखातीत असा अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो. किंबहुना तो आनंदरूपच होतो.
स्वतःच शुद्धबुद्ध होऊन विश्वरूप पाहू लागले की सर्वच आनंदमय, मंगल आहे याची प्रचीती येते. काही जीव पूर्वापार त्रिगुणांचे काही दोषांमुळे, अज्ञानात गुरफटून आनंदाला आच्छादित करतात. शिव होऊनच सर्वत्र शिवमय पाहता येते.
कोणतीही गोष्ट अमुकच तऱ्हेने होणार अथवा व्हावी अशा तऱ्हेचा आग्रह नसावा. सर्व संकल्प ईश्वराच्याच इच्छेनुसार जसे व्हावयाचे तसेच पार पडतात. आपण केवळ निमित्तमात्र असतो.
सर्व चिंता कोठपर्यंत ? कर्ता ईश्वर आहे ही श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत, देहाहंकार असेपर्यंत. मिठाला पाण्याचे भय. पण ते पाण्यात मिसळल्यावर पाणीच होते. मग भय कोठचे ? तद्वत ज्याने सर्व विश्व मायेने केले, पाळले व त्या विश्वाचा लयही जो करतो तोच जर आपणच झालो तर संसारातील भये, चिंता, काळज्या कोणाला ? मनोमन सर्व त्यालाच अर्पण झाले की सर्वच गोष्टी साध्य होतात.
जो संकटकाळी न डगमगता, न खचता, श्रद्धापूर्वक दैवताचा आठव, सद्गुरुंचे स्मरण करतो, भक्ती ठेवतो तो त्यातून निभावून जातो. दुःख सहन करताना धैर्य व शक्ती साधकास येते व नंतर नित्यानित्यविवेकाने त्याचा त्यालाच उमज पडतो. कर्मगती अतिगहन व ती सर्वांनाच आहे. ईश्वराजवळ धैर्य व शक्ती मागावी व देव ती देतोच.
सोऽहं अनुसंधानाने आपल्या शरीरातील सर्व व्यापारच त्रयस्थ भूमिकेतून पाहता येऊ लागतात. क्रोध उत्पन्न होण्याची परिस्थिती आली की सोऽहं अनुसंधान करून पाहा, क्रोधच येणार नाही.
आपल्या ठिकाणी मीपणाची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली असतात. ह्यालाच अहंकार म्हणतात. हा अहंकार समूळ गेला, सारासार नित्यानित्यविवेक करून मी ची जाणीव परब्रह्मात लीन झाली की अलिप्तता आपोआपच साधते. त्यास कर्तेपणही उरत नाही. सोऽहं हेच त्यास साधन. सोऽहं चिंतनाने मनाचा पवनात लय करून त्याचा गगनात लय करावयाचा.
अखंडानुसंधानाने सोऽहंमधील अहं हळूहळू गळून जाऊन सः च शिल्लक उरतो. स्वानुभव तसा येऊ लागला की अनन्यभक्तीस सुरुवात होते.
सर्वकाळी सर्वत्र स्वानुभूतीचा आनंद भोगावा पण ही स्थिती जेव्हा साधेल तेव्हा साधेल. आपण अखंड वाटचाल मात्र चालू ठेवावी. सतत सोऽहं अनुसंधानानेच सर्व साधेल, हे पक्के लक्षात ठेवा.
सुख-दुःख कोणासही सुटले नाही. पण साधकाने कोणतेही कर्म करताना, चालता, बोलता, उठता, बसता नेहमी मी ते स्वरूप आहे याची जाणीव सतत ठेवीत जावी. हळू हळू साधक सिद्ध होत जातो.
आपले सद्गुरू व मीच सर्वत्र सर्व रूपाने नटून सर्व काही चालले आहे अशी साधकाची भावना होऊन तो निरहंकारवृत्तीने सर्वत्र पाहू लागला की त्याला कशाचीही बाधा येत नाही.
कोणी कसेही कोठेही साधना करो, साधकाने वर्षातून निदान एकदा तरी गुरूजवळ येऊन अडीअडचणींचा विक्षेप दूर करण्यासाठी, स्वतःचे भ्रम दूर करून घेण्यासाठी स्थिरत्वाने अभ्यास चालू ठेवण्याचा मार्ग समजून घेणे बरे. प्रगती ज्याची त्यानेच करून घ्यावयाची असते.
कर्मफळ ज्याचे त्यास भोगावेच लागते हा सृष्टिनियम. सर्व गोष्टी प्रभूच्या हातात. निष्कामपणे प्राप्तकर्म व फळ ईश्वरावरती सोपवावे. त्यासच एकनिष्ठेने शरण गेल्यास आपले ज्यात कल्याण होईल अशाच घटना तो ईश्वर करतो.
कर्मभोग भोगूनच संपवणे हे योग्य. कोणतीही उपासना फलासक्ती रहित असणेही चांगले व तेच हिताचे असते.
गुरूजवळ अहंकार किंचितही चालवू नये. नेहमी सद्गुरू-वचनामृत प्राशन करून त्याचेच मनन व ते अनुभवास आणण्याचे प्रयत्न करणे हे शिष्याचे व्रत असावे. पूर्ण अनुभवास आले नसताना 'मला माहित आहे' असे कधीही शिष्याने बोलू नये.
ह्या परमार्थात, अद्वैतात कोणी कोणाला काय द्यावयाचे आणि कोणी कोणाकडून काय घ्यावयाचे ? येथे देण्याघेण्यासारखे काही नाही. ह्या प्रांतात देण्याघेण्याची भाषाच नसते. स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावयाचा हा मूळ सिद्धांत. आपलाच आनंद आपणच भोगायचा, लुटावयाचा. हा अद्वयानंद अनुभवायचे, लुटावयाचे साधन म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने करावयाचे सोऽहं ध्यान होय.
मुख्य देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी हाच अभ्यास.
ईश चिंतनयुक्त, भक्तियुक्त अंतःकरणाने साधन चालू राहिले, निरहंकाराने, ईश्वरार्पण बुद्धीने कार्ये होऊ लागली की एक दिवस असा उजाडेल की, "सुख सुखरूपा घडिजे । माझियाची आंगा ।।" सुखरूप, आनंदमय अशा ईश्वराच्या स्वरूपातच आपण मिसळून जाऊ. जो अहंकार, अभिमान आहे तो ईश्वराच्या भक्तीतच रूपांतरित होईल.
गुरूने सांगितलेल्या मार्गाने दिवसातून काही वेळ साधन केलेच पाहिजे. हळूहळू गोडी वाटू लागते. सोऽहंसाधनेने चित्त हळू हळू ब्रह्मभावना धारण करते. चित्तच पुढे चैतन्यमय होते. ते आत्मरूपच होते. हळू हळू अभ्यासाने सोऽहं साधनेने चित्त-मन प्रपंचातून-सांसारिक गोष्टीतून सुटून आत्मरूपाशी जडते. हाच अभ्यास.
अलिप्ततेने, साक्षित्वाने, अनहंकाराने, भक्तियुक्त अंतःकरणाने केलेली कर्मे बाधत नाहीत. कर्ता करविता तोच अशा वृत्तीने वर्तता येऊ लागले की हळूहळू भक्त ईश्वररूपच होतो. विभक्त न राहता अनन्य होऊन मुक्तीवरील भक्तिसुख-स्वानंद सुख भोगता येते.
अभ्यास मुद्दाम अट्टाहासाने वा लौकिक प्रसिद्धीसाठी नको. जसजसे आत्मस्मरण होईल तसतसा अभ्यास वाढत जातो.
हा मीपणा, अहंपणा आत्मस्वरूपाशीच निगडित असतो. पण तो मी आत्मरूपाशी विलीन होऊन नाहीसा होणे व केवळ आत्मरूपच अनुभवास येणे ह्या गोष्टी केवळ संतसंगमानेच शक्य.
विषयांबद्दल निरिच्छता उत्पन्न झाली, कर्तृत्व अहंकार कमी होऊ लागला की श्रीगुरु आपोआप भेटतीलच. सर्व कर्मे अनासक्तिने केल्यामुळे संचितात भर पडत नाही. प्रारब्ध भोग आनंदाने भोगता येतो. श्रीकृपेने ही कर्मकर्तृत्वाची खटपट थांबते.
अनेक दिव्य दृश्ये दिसणे, दिव्य नाद ऐकू येणे याला साक्षात्कार म्हणत नाहीत, तर ज्यायोगे म्हणजे ज्याच्या आधारावर हे नाद ऐकणे व दृश्य पाहणे अवलंबून असते, ती सद्वस्तु दुसरी नसून आपणच आहोत, हा अनुभव येणे, आपणच सद्वस्तूरूप होणे याला साक्षात्कार म्हणतात.
स्वकर्म कितीही हलके असो, पण ते ईश्वरदत्त असे समजून ते कर्म चोख रीतीने केले तर ती भगवंताची एकप्रकारे पूजाच होते. भक्ताने 'आपली काळजी देवाला' असा कळकळीचा भरवसा धरला तर देव तो भार खरोखरीच घेतो पण भक्तच जर आपल्या काळजीचे ओझे अहंकाराने स्वतःच्या शिरावर घेईल तर देव दुरूनच मौज पाहिल. भक्तालाच सुखदुःखाचे वाटेकरी व्हावे लागेल. जो अनन्य झाला त्याला काळजी नाही. संकटेसुद्धा तो सुखाने पार करून जातो.
आत्म्यासंबंधी सतत विचार करत, आत्मबोधाने - आत्मानुभूतीने जगलेले जीवन गुरूने सांगितलेल्या साधनेने सफल होते. नुसते ब्रह्मज्ञान झाले तरी सफलता आली असे होत नाही. गुरुपदिष्टमार्गे अनन्यभावाने गेल्यास कल्याणच होईल यात तिळमात्र संशय नाही.
ज्याचा त्याचा अनुभव त्याच्यात्याच्या दृष्टीने श्रेष्ठच, त्यावर इतरांनी अविश्वास दाखवू नये. जशी भक्ती तशी प्राप्ती हेच खरं.
गुरूने सांगितलेल्या मार्गाने, श्रद्धा ठेऊन ज्याने त्याने प्रगती करून घ्यावी हेच खरे.
स्वतःच्या मनाला स्वतःच केलेला उपदेश उत्तम, दुसऱ्याला न बोलता, शिकवता आपला आपणच बोध घ्यावा हा सर्वात उत्तम मार्ग.
अध्यात्म म्हणजे सहज वागणे, शांतपणे व आनंदात ईश्वराची प्रेममय लीला अनुभवणे. ईश्वरी लीलेचा आनंदमय लाभ घेणे.
आपण आपल्या शरीराला मी म्हणतो आणि तसे समजतोही. परंतु ह्या शरीरात ज्याचे अस्तित्व कोणासही प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करता येत नाही अगर ते अमुक प्रकारच्या गुणधर्मांनी युक्त असल्याचेही सिद्ध करता येत नाही, असेही एक तत्त्व आपल्या शरीरात वास्तव्य करीत असते. मी अगर चैतन्य अगर अन्य नावानेही ते संबोधिले जाते.
माझा देह, माझी बुद्धी, माझं मन असे म्हणणारा जो मी तो मी देहूहून निराळा आहे. तो मी हे आपलं स्वरूप. ते जाणलं पाहिजे; ओळखलं पाहिजे.
आत्मरूपाची अनुभूती म्हणजे अखंड प्रसन्नता ! शांतिमय - सुखमय - आनंदमय स्थिती. अशी स्थिती झाली की सर्व कर्मे करूनही निष्कर्मता अनुभवास येते. हीच जीवन्मुक्तदशेची अनुभूती होय.
आजची पूजा
प्रातः समृद्ध पूजा
सायं समृद्ध पूजा