स्वामींचे कुलनाम गोडबोले ह्या घराण्याचे मूळपुरुष गोविंदभट गोडबोले कासारवेलीहून पावस येथे आले. आल्यानंतर पावस येथेच गोडबोले घराण्याचा वंशवृक्षवाढू लागला. स्वामींचे आजोबा पर्शरामपंत गोडबोले हे कर्तबगार पुरुष होऊन गेले. पर्शरामपंतांचा उपनयन संस्कार काशीक्षेत्री झाला. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पर्शरामपंतांची बुद्धी तल्लख होती.. शिक्षण झाल्यावर इ. स. १८५८ साली शिक्षण खात्यात अधिकाराचे पद मिळाले. त्यांच्या नोकरीची बरीचशी वर्षे बेळगाव-धारवाड भागात गेली.त्यांच्या पत्नी सौ. गंगाबाई ह्या देखील त्याच गावच्या, माहेरच्या देशमुख. ईश्वरभक्त, मनमिळाऊपतिपारायण अशा गंगाबाईंचे ग्रह फिरले आणि १२ वर्षांचा पतीविरह त्यांच्या वाट्याला आला. पर्शरामपंतांचा सावत्र भाऊ खूप रडका  असल्याने त्याला अफू देऊन झोपवावे लागे एकदा अफू देण्याची जबाबदारी गंगाबाईंवर आली. त्यांना अफूची मात्रा किती द्यायची हे  माहित नसल्याने घरातील व्यक्तींना विचारून मात्रा दिली. पण ती मात्रा जास्त झाल्याने तो सावत्र भाऊ दगावला आणि त्याचा आळ गंगाबाईंवर आल्याने त्यांना माहेरी पाठवण्यात आले. एकाच गावात सासर-माहेर दोन्ही असल्याने माहेरी राहणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे एके दिवशी भल्या पहाटे गंगाबाईंनी मोजक्या वस्त्रांनिशी नरसोबावाडीस प्रस्थान ठेवले. तेथे एका भल्या माणसाने गंगाबाईंना आश्रय दिला. तेथे सकाळी कृष्णेत स्नान करूनदत्ताला प्रदक्षिणा घालतदुपारी भिक्षा मागून त्यावर उदरनिर्वाह करतकीर्तन-प्रवचनांचा लाभ घेत गंगाबाई दिवस घालवत असत. तसेच त्या एका सत्पुरुषांचे नित्यनेमे दर्शन घेत असत.

यामधील बारा वर्षांच्या काळात पर्शराम पंतांचे दुसरे लग्न होऊन त्यांना ३-४ मुले झाली होती. पण त्यातील एकही मूल जगले नाही आणि पत्नीचेही निधन झाले. त्यामुळे अत्यंत निराश झालेल्या पर्शरामपंतांना स्वप्नात एका सत्पुरुषाने दर्शन देऊन "तू नरसोबाच्या वाडीस येऊन आपल्या पहिल्या पत्नीला घेऊन जा. तिच्यासोबत संसार कर. त्याने तुझे सर्व कष्ट दूर होतील." असा दृष्टांत दिला.यादृष्टांतानुसार पर्शरामपंत वाडीस आले. आपल्या पहिल्या पत्नी गंगाबाईंना बघितल्यानंतर त्या सत्पुरुषांचा "तुमच्या वंशात ईश्वरभक्त निर्माण होऊन कुळाची कीर्ती दिगंती पसरेल." असा आर्शिर्वाद घेऊन गंगाबाईंच्या सह पर्शरामपंत परत घरी आले. नंतर त्या दांपत्याला सदाशिव व विष्णू अशी दोन अपत्ये झाली. १८८३ पर्यंत बेळगाव-धारवाड भागात शिक्षण खात्यात नोकरी करून पाऊणशे रुपये पेन्शन घेऊन पर्शरामपंत पांवसला घरी परतले. सदाशिव व विष्णू या दोघांचीही लग्ने लहानपणीच झाली होती. पर्शरामपंत मोठे दिलदार होते. त्यांना पेन्शन होतीचसोबत नोकरी करताना साठवलेली पुंजी आणि घराची सुबत्तासुद्धा होती. त्यामुळे "अतिथी देव भव" या तत्त्वाने दानधर्म करीत त्यांनी आयुष्य व्यतीत केले. मोठा सदाशिव बुद्धीने बेताचा; पण विष्णू मात्र तल्लख, हुशार. मॅट्रिकपर्यंत शिकलेला. त्यामुळे विष्णुपंतांवर संसाराची जबाबदारी सोडून इ. स. १९०९ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी पर्शरामपंतांनी सुखाने देह ठेवला.

स्वामींचे वडील विष्णुपंत यांचा जन्म पावस येथे १८६९ रोजी झाला. पर्शरामपंत निवृत्त झाले तेव्हा विष्णुपंत १४ वर्षांचे आणि इंग्रजी तिसरीत होते. त्यामुळे बेळगावातच सोमण यांच्या घरी राहून  शिक्षण पूर्ण करून मग विष्णुपंत पावसला परत आले. विष्णुपंतांना नोकरी करून पैसे मिळवावेत असा ध्यास नसल्यामुळे घराची जबाबदारी सांभाळून विष्णुपंतसंसार करू लागले. वयाच्या चाळिशीपर्यंत पितृछत्र असल्याने संसाराची झळ विष्णुपंतांना लागली नाही. त्यामुळे मुळातच निगर्वी, शांत मनोवृत्तीचे असलेले विष्णुपंत निरासक्त मनाने संसार करीत असत. काम करत असतानाच सतत नामस्मरण किंवा विष्णुसहस्रनामाचे पाठ विष्णुपंत करीत असत.

विष्णुपंतांची पत्नी म्हणजेच स्वामींची आई सौ. रखमाबाई ह्या पावस  जवळील गोळप गावच्या गोखले नावाच्या श्रीमंत घराण्यातील होत्या. त्याच संसारात जास्त लक्ष घालीत असत. संसाराशी संबंधित सर्व कसोट्या पार करून रखमाबाईंनी सर्वांची वाहवा मिळवली होती. वडिलोपार्जित धन वाढत्या संसाराला पुरणारे नाही ह्याची रखमाबाईंना जाणीव होती. त्यामुळे त्या "नोकरी-धंदा काहीतरी करा" असे सतत विष्णुपंतांना सांगत असत.विष्णुपंत व रखमाबाई ह्या दंपतीला पहिले कन्यारत्न झाले. स्वामींपेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या ह्या कन्येचे नाव 'द्वारकाबाईअसे होते. रत्नागिरीजवळच केळ्ये या गावी ह्यांचे सासर असून आईचे गुण पूर्णपणे द्वारकाबाईंमध्ये उतरले होते. त्यामुळे पतिनिधनानंतरसुद्धा न डगमगता मुलांची शिक्षणे पूर्ण करून, प्रपंच चालवून सांपत्तिक स्थिती सुधारली होती.

द्वारकाबाईंनंतर गणपती नावाचा मुलगा झाला. तल्लख बुद्धीमुळे मॅट्रिकनंतर पोस्टखात्यात नोकरी लागली. गणपती म्हणजे "देवमाणूस". त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई ह्यासुद्धा गणपती ह्यांना अनुरूप होत्या. त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होऊन दोन मुले आणि चार मुली अशी एकूण सहा अपत्ये त्यांना झाली. आणि सर्वजण सुस्थित होते.त्यांच्यानंतर विष्णुपंतांना महादेव नावाचा मुलगा झाला. पण तो वयाच्या तेराव्या - चौदाव्या वर्षीच वारला. त्यानंतरच्या ह्या दंपतीचे शेंडेफळ म्हणजे स्वामी स्वरूपानंद म्हणजेच विष्णुपंतांचा सगळ्यात लहान मुलगा रामचंद्र. आपल्या सर्वांचे आप्पा.

विभूतियोगात भगवंतांनी सांगितलेल्या 'मासानांमार्गशीर्षोऽहम्' अशा मार्गशीर्ष महिन्यात वद्य द्वादशीला प्रसन्न, मंगलमय वातावरणात १५ डिसेंबर १९०३ रोजी स्वामींचा जन्म झाला. पुत्रजन्मामुळे घरात अत्यंत आनंदी वातावरण होते. रामचंद्र असे नाव असूनही अप्पा या नावाने सर्वजण त्यांना संबोधू लागले. सर्वांचा लाडका असणारा आप्पा आजोबा, आई-वडील,काका-काकू यांच्या कृपाछत्राखाली मोठा होत होता. आजोबांचे शिक्षणाकडे असणारे काटेकोर लक्ष, आईची शिस्त, घरी येणारे विद्वान पाहुणे यांच्यामुळे या सर्व भावंडांची उत्तम प्रगती होत होती. तसेच लालन, पालन,सुशिक्षण यांचा लाभ या भावंडांना बालपणात होत होता.

अप्पांची बुद्धी तल्लख असल्याने शाळेत सांगितलेला अभ्यास लगेच करून अप्पा खेळायला जात असे. खेळायला सवंगडी पण खूप होते. लंगडी, हुतूतूआट्यापाट्या असे खेळ खेळत असताना या सर्व खेळात नेतृत्व अप्पांकडेच असे. खेळातही अप्पा शिस्तीला महत्त्व देत असत. असे असले तरी सांगितलेल्या  कामात कधी कुचराई होत नसे. मोठी भावंडे संध्या करीत असताना पाहून मुंज व्हायच्या आधीच सर्व संध्या अप्पांना पाठ झाली होती. गावातील देवळांमधून होणाऱ्या कीर्तन-प्रवचनांमधून ध्रुव, उपमन्यु अशा कथा ऐकल्यामुळे या सर्व गोष्टींचा अप्पांना परिचय झाला होता.

अप्पांच्या आजोळी, गोळपला घरात देवाची यथासांग पूजानंदादीप, आरती इ. न चुकता असे. त्यामुळे या सर्वांचे संस्कार अप्पांच्या मनावर होत गेले. आठव्या वर्षी पावसला मुंज झाल्यावर संध्या इ. काटेकोरपणे अप्पांकडून वडीलमंडळी करवून घेत असत. त्यात कुचराई कधीच केली नाही. कालानुरूप नव्या-जुन्याची सांगड घालूनच आपण वागले पाहिजे असे अप्पांनी ठरवूनच टाकले होते. एखादी गोष्ट न समजता,पटवून न घेता करणे हे अप्पाना आवडत नसे. पण वडीलमंडळींच्या इच्छेसाठी अप्पा अशाप्रकारे वागत असत.

पावस येथे मराठी पाचवी इयत्तापूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी अप्पा रत्नागिरीत आले. १९१४ ते १९१९ पर्यंतरत्नागिरीमध्ये 'नागूस्कूल' व शेवटच्या वर्षी 'रत्नागिरी हायस्कूल' मध्ये अप्पांचे शिक्षण झाले. त्याकाळात अप्पांची चुलती, मोठा भाऊ, बहीण हे रत्नागिरीत अप्पांसोबत राहत असत. खेडेगावातूनशहरात आल्याने अप्पांच्या महत्त्वाकांक्षांना पालवी फुटू लागली. ज्ञानार्जनाची मुळात आवड असल्यामुळे ज्ञानप्राप्तीची एकही संधी अप्पा सोडत नसत. कीर्तने, प्रवचने, वर्तमानपत्रे, ग्रंथालयाची पुस्तके अशा प्रकारे अप्पांचे ज्ञानार्जन सुरूच होते. सर्वसामान्यांप्रमाणे टिळकांचा केसरी वाचून अप्पासुद्धा भारले  जात होते. त्यामुळे वर्गातील हुशार विद्यार्थी असणाऱ्या अप्पांच्या मित्रांसोबत सुद्धा स्वातंत्र्याबाबत काय करता येईल अशा चर्चा घडत असत. १९१९ मध्ये इंग्रजी  पाचवीची परीक्षा पास झाल्यावर आप्पा गावी गेले.दीड महिना मित्र सवंगडी नातेवाइकांच्यात राहून नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईलाजाण्याचे ठरले. मुंबईला अप्पांचे थोरले बंधू गणपतराव यांचे बिऱ्हाड होते. तेथे अप्पा, चुलती बाया यांच्यासोबत गेले.

मुंबईतील शिक्षण -

मुंबईला 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या विद्यालयात जून १९१९पासून अप्पांचे पुढील शिक्षण सुरु झाले. रोज प्रार्थना झाली की अर्धा तास धर्मशिक्षण दिले जाई, हा या विद्यालयाचा विशेष. त्यामुळे मनाजोगे विद्यालय मिळाल्याचा आनंद अप्पांना झाला. वयोवृद्ध व तपोवृद्ध अशा घारपुरे शिक्षकांचा अप्पा हा आवडता विद्यार्थी. त्यांच्यामुळे अप्पांना संस्कृतची गोडी लागली. मुंबईत येऊन अप्पांच्या चौकस बुद्धीचा अधिक विकास झाला. मोठी जबाबदारीची कामे अंगावर घेऊन ती धडाडीने तडीस नेण्याची धमक अप्पांच्या अंगी आली. अप्पा मुंबईला राहायला आले आणि लगेचच शेजारील विनायक गोपाळ तथा काका लिमये आणि शेजारच्या कृष्णाजीपंत गोखल्यांचा  पुतण्या विश्वनाथ दत्तात्रय उर्फ बाबू गोखले यांचे त्रिकुट जमले. गॅलरीच्या कठड्यांवर बसून या तिघांची राजकारणावर चर्चा झडत असे. अप्पांना लेखन-वाचनाची दांडगी हौस होती. मराठीवर अप्पांचे प्रभुत्व होते. कादंबऱ्यांपेक्षा नाटके, चुटकेविनोदी लेख अप्पांना अधिक आवडत असत. त्याकाळातील लोकप्रिय नाटककारांच्या नाटकांचा अप्पांनी काटेकोर अभ्यास केला होता. काही नाटकातील पात्रांची भाषणे अप्पा वाचून सुद्धा दाखवीत असत.

लोकमान्यांबद्दल नितांत आदर असणारे अप्पा लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर गांधीपंथाची दीक्षा घेऊन एकनिष्ठेने तो पंथ चालत होते. संपूर्ण लक्ष आता देशसेवेकडे लागले होते. खादीचा स्वीकार करून राष्ट्रीय शाळेत दाखल झाले होते. पण याला घरच्या मंडळींचा विरोध होता. लोकमान्यांच्या विचाराचा जबर पगडा असल्याने परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला. घराच्या मंडळींचा विरोध असूनही अप्पा 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या विद्यालयावर बहिष्कार घालून बाहेर पडले. खादीचे व्रत घेतल्यामुळे चरखापेळू, तकल्या इ. वस्तू आप्पांनी पवित्र वस्तूंसारख्या खरेदी केल्या आणि या सर्वांसकट अप्पा पावसला परतले. तत्पूर्वी १९२२ मध्ये टिळक महाविद्यालयाची परीक्षा देऊन अप्पा त्यात पास झाले होते.


पावसला पुनरागम आणि स्वावलंबनाश्रम

अप्पा पावसला आले तेव्हा घरची सांपत्तिक स्थिती बरीच ढासळली होती. वडील मुंबईस नोकरी करू लागले होते. पण संपूर्ण खादीचा वेष, ध्येयनिष्ठविरक्त तरुण पाहून गावातील लोक मात्र आता अप्पांबद्दल आदराने बोलत असत. मुंबईत राहून विचार अधिक व्यापक झाल्यामुळे अप्पा नोकरी-व्यवसाय करून घरच्या परिस्थितीला हातभार लावतील अशी चिन्हे  दिसत नव्हती. प्रखर देशभक्तीमुळे परत आल्यावर त्यांनी पावस सारख्या छोट्या गावात १९२२ रोजी"स्वावलंबनाश्रम" नावाने राष्ट्रीय शाळा सुरू केली. त्याची सर्व जबाबदारी अप्पाच घेत होते. अप्पा विद्यार्थ्यांशी सलगीने वागत असले तरी विद्यार्थ्यांवर अप्पांचा वचक होता. 


पुण्यपत्तनास प्रयाण -

पावसला परत आल्यावर एके दिवशी अप्पांचे मामा केशवराव गोखले यांच्या पत्रानुसार अप्पा मुंबईस गेले. तेथून पुण्यास जाऊन सद्गुरू श्री बाबामहाराज वैद्य यांच्याकडून अनुग्रह घेतला. अनुग्रहानंतर ध्यानधारणेसोबत स्वावलंबनाश्रमात मुलांना शिकवण्याचे कार्यही जोरात सुरु होते. शाळेतील मुलांची संख्या वाढत असतानाच अप्पांनी सामाजिक सुधारणेसाठी उत्सवांमध्ये राष्ट्रीय मेळे काढण्यास सुरुवात केली.त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातच अप्पा आधी स्वतः तासभर राष्ट्रभक्तीपर  विचार मांडीत असत. पण हळू हळू सरकारी रोषाच्या भीतीने स्वावलंबनाश्रमातील मुलांची संख्या कमी होऊ लागली. देशातील इतर शाळा सुद्धा बंद पडल्या होत्या. घरची परिस्थिती सुद्धा खूप खालावली होती. पण स्वामींनी शाळेतील तीन विद्यार्थ्यांना टिळक विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेस बसवण्याचे ठरवले आणि त्या तिघांसह अप्पा परत पुण्यास आले. पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून अप्पा  "समर्थभारत छापखान्या"त नोकरी करु लागले होते. सोबतचे विद्यार्थी सुद्धा परीक्षा संपल्यावर छापखान्यात लहान मोठे काम करत होते. ह्या गडबडीत सुद्धा अप्पांची राष्ट्रभक्ती जागृत होती. नोकरी करून साठवलेल्या रकमेतून अप्पांनी गावातील मुलांसाठी १६-१७ लेझीम खरेदी केले. सोबत असणाऱ्या बोथरे आणि सामंत या दोन विद्यार्थ्यांना यामध्ये तयार केले होते. नंतर अप्पांनी या विद्यार्थ्यांना रत्नागिरी हायस्कूल मधून मॅट्रिकच्या परीक्षेला बसवण्याचे ठरवले. त्याचवेळी आबा सामंत उतरत असताना पडला. त्याचे ताबडतोब ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी अप्पांनी  त्याची खूप काळजी घेतली. प्रसंगी राहण्यासाठी त्याला आपल्या घरी घेऊन आले. पण अप्पांनी वाङ्मय विशारद ही पदवी घेण्यासाठी परत पुण्यास जाण्याचे ठरवले व सोबत पुन्हा सामंत व बोथरे या दोन विद्यार्थ्यांना घेऊन गेले. पुन्हा त्या "समर्थ भारत छापखान्या"त नोकरी करु लागले.

नंतर अप्पांना टिळक विद्यापीठाच्या "वैदिक संशोधन मंडळा"मध्ये काम मिळाले. प्रेस मधील कामापेक्षा कामाचा वेळ कमी आणि पगार जास्त होता. त्यामुळे अप्पांना अधिक वेळ मिळू लागला आणि हाती घेतलेले "ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखिता"चे काम मार्गी लागले. तसेच सद्गुरूंचा मिळणारा सहवास सुद्धा वाढला. त्यामुळे अप्पांची परमार्थाच्या मार्गावर वेगाने प्रगती होऊ लागली आणि लवकरच ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत स्वामींनी पूर्ण करून आपले सद्गुरू बाबामहाराज वैद्य यांना अर्पण केली. नंतर सद्गुरूनाथ बाबांच्या सान्निध्यात ब्रह्मसत्र सोहळा अनुभवून गुरुबंधूंच्या भेटीने स्वामी आनंदित झाले. आता स्वामींचा विचारपक्षी उड्डाण करू लागला होता. जे जे उत्कटउदात्त, उन्नत,भव्य असेल ते ते स्वीकारण्याची नि:शंक तयारी आता बुद्धिपूर्वक त्यांच्या अंगी बाणली गेली. त्यांचे विचारत्यांचे ज्ञान, त्यांची श्रद्धा आता अथांग, अपार अशा विश्वाला गवसणी घालण्याला सिद्ध झाली. १९३० साली मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत टिळक विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत अभ्यासक्रम बासनात गुंडाळून अप्पा सुद्धा उतरले. पण सत्याग्रह मागे घेण्यात आल्यानंतर अप्पा परत पुण्यास येऊन टिळक विद्यापीठात नोकरीवर रुजू झाले. त्यावेळी सद्गुरू सेवा घडतच होती. १९३१ साल उजाडले आणि अप्पांनी वाड.मय विशारदचा अभ्यास हिरीरीने सुरु केला व अभ्यासात इतके दंग झाले की राजकीय क्षेत्रात रंगलेली व सत्याग्रह-सन्मार्गात सरावलेली वृत्ती आता तेथून निवृत्त होऊन विद्यार्जनाकडे प्रवृत्त झाली.


कायदेभंग आणि तुरुंगवास -

अप्पांनी १९३० साली रत्नागिरीमध्ये सत्याग्रहात भाग घेतला. त्यावेळी त्यांना प्रथम दोन महिन्यांकरिता स्थानबद्धतेची शिक्षा देण्यात  आली. पण अप्पांनी हा हुकूम मानायचा नाही असे ठरवले आणि ते रत्नागिरीस जात असताना वाटेतच भाट्ये येथे स्थानबद्धतेचा भंग केल्याबद्दल तीन महिने कारावास आणि ५० रुपये दंड करण्यात आला. कारावासाची कल्पना असह्य होत असली तरी दंडाची रक्कम भरण्याइतके पैसेही जवळ नव्हते. शेवटी स्वामींच्या मातोश्रींनी हातातील सोन्याची पाटली पोलिसांना दिली. त्यातून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. स्वामींची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्या पाटलीतील उरलेला सोन्याचा तुकडा त्यांना परत देण्यात आला. यानंतर अप्पा पुण्यास गेले असता तेथेही त्यांना पकडून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. कारागृहात बडयामंडळी सोबत राजकारणावर चर्चा होत असताना सुद्धा अप्पा तासन् तास ध्यानधारणेत मग्न असत. आता ते लोक अप्पांना कौतुकाने 'स्वामी','मुनी' असे म्हणू लागले. कारागृहात इतर उद्योग बंद असल्यामुळे अप्पांना वेळच वेळ मिळत होता. त्यामुळे साधकावस्थेच्या प्रगतीच्या पायऱ्या झपाट्याने आक्रमित अप्पा आता सिद्धावस्थेच्या प्रांतात प्रविष्ट झाले. याच काळात अप्पांनी सद्गुरू बाबामहाराज यांना अर्पण करण्यासाठी   "नवरत्नहार" नावाचे ९ ओव्यांचे काव्य रचले हा नवरत्नहार गुरूंना अर्पण केल्यावर बाबामहाराज अत्यंत प्रसन्न झाले. संप्रदाय चालवण्याचे मोठे कार्य बाबामहाराजांनी अप्पांवर सोपवले. स्वरूपाच्या ठिकाणी नेहमी लक्ष लागत असल्यामुळे बाबामहाराज आता अप्पांना "स्व-रूपानंद" या सार्थ नावाने संबोधू लागले.

अंतिमतः बऱ्याच व्यत्ययानंतर १९३३ च्या डिसेंबर महिन्यात अप्पांनी टिळक विद्यापीठाची वाङ्मय विशारद ही परीक्षा दिली आणि ते उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. नंतर उरलेल्या चार विषयांची तयारी पावसला राहून करावी असे त्यांनी ठरवले. त्यानुसार पावसला जाऊन अभ्यासाला सुरुवात केली. पण १९३२मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सरकारने बेकायदा ठरवल्यामुळे बंदी उठल्यावरही ते पुन्हा सुरु झाले नाही. पण अप्पांची अभ्यासाची तयारी पाहून विद्यापीठाने १९३४ मध्ये अप्पांना "वाङ्मयविशारद"ही पदवी बहाल केली.


गृहस्थाश्रमाचा योग आणि वियोग -

अप्पांच्या जीवनातला काही भाग हा नाजूक धाग्यांनी विणलेला आहे. तो त्यांनी कधी लपविला नाही. सन १९३४ च्या प्रारंभी अप्पांचा एका तरुणीशी परिचय झाला. त्या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी संसारात पदार्पण करून पुण्यात बिऱ्हाड करून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधावे असे त्यांना वाटत होते. पण मधून मधून वैराग्याचे विचार मनात येऊन या पाशात अडकू नये असेही वाटत असले तरी ह्या वैराग्याच्या विचारांची धार आता बोथट झाली होती. पण काहीकारणाने उभयतांच्या मनोरथाचा डोलारा कोसळला आणि अप्पांची घोर निराशा झाली. ह्यासर्व घटनांचा अप्पा अनुभव घेत होते. पण ह्या सर्व नाटकावर शेवटचा पडदा टाकून ह्या सर्वातून आपण सहीसलामत बाहेर पडावे असे अप्पांनी ठरवले आणि त्यानंतर सुमारे २०० ओळींचे "मृत्युपत्र" नावाचे सुंदर काव्य त्यांनी लिहिले. वाङ्मय विशारद परीक्षेच्या उरलेल्या चार विषयांची तयारी करत असताना पुन्हा विवाहाचा योग जुळून आला. पण त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला महत्त्वाकांक्षी स्वभावाची जोड असल्यामुळे त्यांच्या विचाराची ओढ त्यांना पुनःपुन्हा संसार-त्यागाची महती पटवून निवृत्तीकडे खेचत होती. पण विवाहाचे योग प्रकर्षाने जुळून येत असता स्वामींच्या हाकेला तत्परतेने उत्तर देऊन भगवंतानेच जणू स्वामींची यातून मुक्तता केली. सुरुवातीला मलेरिया झाला. पण नंतर लगेचच या मलेरियाने इतका तीव्र धक्का दिला की जणू काही आता हे अप्पांचे अंत्यदर्शनच आहे असे जमलेल्या मंडळींना वाटले. पण बाबा देसाई यांच्या औषधाने दुसऱ्यादिवशी सकाळी प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि लोकांना धीर आला. पण ह्या आजाराच्या तीव्र धक्क्याने अप्पांना  सहा महिने  अंथरुणावर पडून काढावे लागले.

अप्पांचे मामा केशवराव गोखले हे पुण्याच्या "बाबामहाराज वैद्य" यांचे अनुग्रहीत होते. गोखले मुंबईला राहत असल्यामुळे अप्पा मुंबईमध्ये शिक्षणासाठी असताना मामांच्या घरी जात असत. त्यामुळे मामांकडील परमार्थाचा हा वारसा आपल्याला मिळावा असे अप्पांना वाटत होते. त्यातच अप्पांचे वडील विष्णुपंत हे सुद्धा बाबामहाराजांचे अनुग्रहित होते. त्यामुळे  प्रखर देशभक्ती असूनही लहानपणापासूनच पारमार्थिकविचारांची बैठक अप्पांच्या आयुष्याला लाभली होती. अप्पा मुंबईत असताना अप्पांची वाढीस लागलेली जिज्ञासा आणि त्यांचे गुण पाहून अप्पांना पुण्यास नेऊन महाराजांकडून अनुग्रह द्यावा असे मामांनी ठरवले आणि तसे पत्र मामांनी पावसला पाठवले. त्यानुसार अप्पा मुंबईस आले आणि तेथून अप्पा व मामा गोखले दोघेही पुण्यास गेले.सद्गुरूभेटीसाठी मन इतके अधीर झाले होते की अप्पांना कशातच राम दिसत नव्हता. अशा या मुमुक्षु अवस्थेतील शिष्याला पाहून बाबामहाराजांचा आनंद द्विगुणित झाला.केशवराव गोखले यांनी सुद्धा आईच्या मायेने बाबामहाराजांकडे अप्पांचे वर्णन केले. "हा परमार्थाचा उत्तम अधिकारी आहे" हे जाणून बाबामहाराजांनी अप्पांना अनुग्रह देण्याचे मान्य केले.ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी बाबामहाराजांनी अप्पांना अनुग्रह दिला आणि परमार्थाच्या वाटेवर अप्पांचा प्रवास सुरु झाला. सद्गुरू वचनामृत चातकाप्रमाणे वरचेवर झेलताच स्वामींची भावसमाधी लागली. परमार्थ आणि देशकार्याची योग्य अशी सांगड घालून अप्पांचा पुढील प्रवास सुरू  झाला.

पावसमध्ये विशारदच्या परीक्षेची तयारी करत असताना मलेरियाच्या आजाराने तीव्र धक्का दिल्यानंतर त्या आजारपणाचे सहा महिने जवळ जवळ पराधीन होऊन अप्पांना काढावे लागले. औषधे सुरूच होती. पण प्रकृती क्षीण होत असूनही त्यांना सहन न होण्याइतकी भरपूर भूक लागत होती. कशाचीच मात्रा चालत नव्हती. हे सहा महिने स्वामी सतत "सोऽहं" ध्यानातच मग्न असत. आजार म्हणजे अध्यात्मिक साधनेची मोठी पर्वणीच मिळाली होती. या काळात अप्पा "अमृतधारा" काव्याच्या १-२ साक्या स्वतःच लिहीत असत. सहा महिन्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नसली तरी आजाराची तीव्रता कमी झाली होती. पण आता या नंतर अप्पांच्या तब्येतीत काही सुधारणा होईल असे वाटत नव्हते, सर्वांना हीच चिंता वाटत होती. पण आता स्वामींना कसलीच चिंता वाटत नव्हती. त्यांच्या सर्व चिंता समूळ नष्ट झाल्या होत्या. अनुग्रह मिळाल्यापासून १२ वर्षे जी साधना सद्गुरूंनी अप्पांकडून करून घेतली होती ती आता फलद्रुप झाली होती. या स्वामींच्या आजारपणाची सुरुवात आषाढात झाली. ह्या संदर्भात त्यांनी रचलेली साकी पुढील प्रमाणे- शुक्ल पक्ष भृृगुवासर रात्रौ आषाढींंची नवमी I अठराशे छप्पन्न शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही II त्यांचा देहभाव संपुष्टात आला हाच त्यांचा मृत्यू. व त्यामुळे हा त्यांचा एकप्रकारे पुनर्जन्म.   गृहस्थाश्रम स्वीकारण्याचे स्वप्न आता समूळ नष्ट झाले होते आणि आता "केवळ उरलो उपकारापुरता" एवढेच राहिले होतेसद्गुरूंनी दिलेल्या "स्वरूपानंद"या नावाप्रमाणे संन्यस्त वृत्तीचे जीवन जगावयाचे राहिले होते. आजारपणाने संसारच काय पण स्वामींच्या बाबत " सोऽहं तेही अस्तवले" अशी स्थिती होती. स्वामी आता नामधारी स्वरूपानंद नसून स्वरूपाच्या आनंदाचे स्वामी म्हणजेच मालक झाले होते.

आणि एकदिवस हवा पालटासाठी बाबा देसाई यांचे वडील अण्णा देसाई स्वामींना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले. हळू हळू स्वामी हिंडू फिरू लागल्यावर दोन महिन्यांनी म्हणजे १९३५ च्या फेब्रुवारी मध्ये स्वामी देसाईंच्या घरी राहण्यास गेले. तिथे  अण्णा देसाई यांच्या  कन्या (श्रीमती ताई)  स्वामींच्या महानिर्वाणापर्यंत  स्वामींची भोजन व्यवस्था  करीत होत्या. स्वामींचा दिनक्रम घड्याळाच्या काट्याप्रमाणे ठरलेला असे. पण स्वामी कुठे तासन् तास ध्यानस्थ बसले तर लोक विपरीत शंका घेत असत, घरी जाऊन आईवडिलांना सांगत असत. पण आपल्या मुलाची आध्यात्मिक स्थिती त्या दोघांना माहित असल्यामुळे ते दोघे आलेल्या लोकांचे ऐकून घेत आणि त्यांना न समजावता परत पाठवत. त्यावेळी देसाईंच्या घरी राहत असताना सुद्धा स्वामी अधून मधून सुट्टीच्या दिवसात, डिसेंबर महिन्यात आपल्या घरी जाऊन राहत असत.

आणि तो दिवस उजाडला ज्यावेळी स्वामींना "सगुण साक्षात्कार" झाला. सन १९४१ च्या सुरुवातीपासूनच स्वामींना  भगवंत दर्शनाची ओढ लागली होती. त्याच्या भेटीची तळमळ वाढली होती. त्या वरील उपाय म्हणून स्वामींनी आपल्या खोलीत विष्णूची एक तसबीर आणून लावली. एक दिवस रात्री १० वाजून गेल्यानंतर सर्व निजानीज झाली होती तेव्हा स्वामी त्यांच्या खोलीत ध्यानमग्न होते. त्यावेळी स्वामींना काळाचे भान राहिले नाही. स्वतःच्या खोलीत असूनही आपण देवघरात आहोत असे वाटले. तेथे काहीतरी लिहीत आहोत असे त्यांना वाटले. तेवढ्यात एकदम विजेच्या कडकडाटाचा आवाज कानी आला व प्रकाश  दिसू लागला. लगेच पुढचे शब्द कानी आले - "वो गोडबोले किधर हैं जिसने ज्ञानेश्वरी लिखा ।" हे शब्दप्रवेशद्वाराकडून आल्यामुळे स्वामींनी नजर तिकडे वळवली. पाहतात  तो "शंख,चक्र, गदा,पद्मधारी श्री विष्णू".प्रथमदर्शनी भगवंतांचे चरण दिसले. नंतर स्वामींनी आपली नजर वर वळवण्यास सुरुवात केली. सुवर्णाप्रमाणे झळाळणारे पीतांबर, गदेचे जमिनीला टेकलेले टोक दिसले. मुखमंडल पाहण्यासाठी स्वामींनी आपली मान  उंचावली.सुमारे २५ फुटाहून  अधिक उंचीवर मोहाचे माहेर असे मुखमंडळ सहस्र सूर्याहूनही प्रकाशमय पण अत्यंत शीतल असल्याने त्या स्वरूपसौन्दर्यपानात स्वामी मग्न झाले.भगवंताच्या अमृतदृष्टीतून होणाऱ्या प्रेमवर्षावामुळे भगवंत-दर्शनाची इच्छा तृप्त होऊन स्वामी भगवंताचे समग्र रूप न्याहाळू लागले. मस्तकी जडिताचा मुकुट,कानी मकराकार कुंडले, कंठीकौस्तुभमणी, गळा वैजयंतीमाळा  आणि वक्षस्थळावर नि:सीम गांभीर्याचे प्रतीक असे श्रीवत्सलांछन. थोड्याच अवधीत हा दिव्य दर्शनाचा सोहळा संपवून भगवान अंतर्धान पावले.

अमृत-धारा- आजारपणाच्या काळात अप्पांच्या साधनेला पूर्णत्व  आले. त्याकाळातील त्यांच्या अंतरंगाचे दर्शन अप्पांनी आजारपणाच्या काळात लिहिलेल्या "अमृत-धारा" या काव्यात दिसते. अप्पा या आजारपणाच्या सहा महिन्यांमध्ये आत्मबुद्धी दृढ करण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या लाडक्या अशा साकी वृत्तात स्वामींनी हे काव्य रचले.

२) भावार्थगीता  - १९३४ मध्ये अमृतधारा हे काव्य रचले. स्वामींना ८-९ वर्षात काव्यस्फूर्ती झाली नव्हती. एके दिवशी गीतेतील "दु:खेष्वनुद्विग्नमना:" या श्लोकावर विचार करीत असता स्वामींना एक साकी सुचली त्याच विचारात स्वामी झोपले. पहाटे उठल्यावर स्वामींना पुन्हा ती साकी आठवली. अशाच प्रकारे गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अनुवाद करावा अशी प्रेरणा झाली. सकाळी उठल्यावर स्वामींनी ती साकी लिहून ठेवली व रोज १० साक्या याप्रमाणे सहा ते सात महिन्यात संपूर्ण गीतेचा साकीबद्ध अनुवाद लिहून पूर्ण झाला. अमृतधारा हे स्वामींचे पहिले काव्य. पण प्रथम प्रकाशनाचा मान मात्र भावार्थगीतेलाच मिळाला.

३) संजीवनी गाथा - भावार्थ गीता लिहून झाल्यानंतर काही महिन्यांनी स्वामींचे विचार आणि अनुभव अभंग स्वरूपात साकार होऊ लागले. तेच "संजीवनी गाथा" म्हणून प्रसिद्ध आहेत. या अभंगलेखन काळीच "स्वामी स्वरूपानंद" हे नाव प्रकट झाले. अभंगांमध्ये कुठेच स्वामींनी अभंगाचा कर्ता म्हणून स्वतःचा उल्लेख केला नव्हता. पण रा. य परांजपे ह्यांनी स्वामींना हे सुचवले आणि स्वामींना सुद्धा हे पटले. परमेश्वराची योजना असे समजूनच सर्व अभंगांच्या शेवटी 'स्वामी म्हणेअसा उल्लेख केला. दर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तींना स्वामी संजीवनी गाथेतील अभंग वाचावयास देत असत.

४) अभंग ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरीचा "अभंग ज्ञानेश्वरी" रचून अनुवाद करावा अशी स्वामींना सहजस्फूर्ती झाली आणि लेखन कार्य सुरु झाले. सुमारे अडीच वर्षे अव्याहतपणे हे कार्य सुरु होते. किरकोळ आजारपण आले तरी लेखन कार्यात खंड पडला नाही. ज्ञानेश्वरीची त्या काळातील मराठी भाषा आजच्या मराठी माणसाला कळणे अवघड होऊ लागले. प्रत्येक ओवीचा अर्थ दिला तरी अथवा ओवीबद्ध अनुवाद केला तरी सर्वसामान्य वाचक कंटाळतो. गद्यापेक्षा पद्यरचनेत अधिक भक्तिभावना असते. त्यामुळे सर्व उणीव दूर होऊन सर्वसामान्य वाचकाची सोय होणे आवश्यक झाले होते आणि हीच उणीव भरून काढण्यासाठी स्वामींना स्फूर्ती झाली.

यानंतर सुमारे १ वर्षातच चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांवर अभंगवाणीत सुबोध रचना केली. 

५) अभंग-अमृतानुभव - ज्ञानोबा माउलींच्या स्वानुभवाचे अमृत ते अमृतानुभव. विसाव्या शतकात मात्र अमृतानुभवाने ज्ञानी आणि विद्वान यांना वेड लावले आहे. अमृतानुभवाचा आस्वाद घेणे सर्वांनाच सुलभ व्हावे म्हणून त्यातील हृद्गत आत्मसात करून ते आधुनिक मराठीत आकंठ भरून आमच्या आटोक्यात आणून देण्याचे दुर्लभ श्रेय स्वामींनी मिळवले आहे. ओवीला अभंगाचे रूप देऊन विभूषित केले आहे. दुजी सृष्टी निर्माण करून नटवले आहे.

६) चांगदेव पासष्टी - हा केवळ ६५ ओव्यांचा ग्रंथ. या ६५ ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी कैवल्य कनकाचे दान चांगदेवांना प्रदान केले. त्या ६५ ओव्यांवर स्वामींनी नवी सृष्टी उभी केली. ज्ञानेश्वरी,अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या त्रयीवर स्वामींनी सुबोध अनुवाद करून मराठी सारस्वत संपदेत भर घातली आहे.

७) तीन प्रवचने - या छोट्याशा पुस्तकात स्वामींची टेप-रेकॉर्ड केलेली तीन प्रवचने छापलेली आहेत. स्वामींनी ज्ञानेश्वर,तुकारामरामदास आदी संतांच्या उपदेशाचे सार प्रकट केले आहे.

८) स्वरूप-पत्र-मंजुषा - स्वामींनी लिहिलेल्या काव्यरूप पत्रांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक होय. प्रत्येक पत्राचा विषय ध्यानी घेऊन सहा पोटविभागात त्या पत्रांचे वर्गीकरण करून स्पष्टीकरण दिले आहे. संकलकांनी त्यावर अभ्यासपूर्ण चिंतनही केले आहे. यामुळे सत्कर्मउपासनातत्त्वज्ञानसांप्रदायिक उपदेशाचे स्वरूप वाचकांना समजून घेणे सुलभ झाले आहे.

मधील काळात स्वामींच्या भक्तगणांची संख्या खूप वाढली आणि ते झेपणे स्वामींना कठीण झाल्यामुळे इतरांच्या आग्रहाखातर स्वामींनी जवळून दर्शन देण्याचे व बोलण्याचे काही काळ बंदकेले. सुमारे एक वर्ष स्वामी खोलीतून बाहेर आले नाहीत. त्यांच्या तब्येतीत चढ-उतार होतंच होते. बघता बघता १९७३ साल उजाडले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्वामींची प्रकृती फार नाजूक झाली होती. स्वामींचा देह आता फारच विकल झाला होता. १९७२च्या ऑक्टोबर मध्ये स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती. त्यांच्या जन्मगृहाशेजारीच ही जागा होती.  स्वामींनीच भूगर्भसमाधीची जागा  नकाशाद्वारे दर्शवून ठेवली होती.. गर्ता तयार झाली आणि स्वामींना निजधामाचे वेध लागले. ८ मार्च १९७४ रोजी त्यांनी "स्वामी निजधामीं चालले" असे काव्य तयार करून त्याची एक प्रत पाकिटात बंद करून ते पाकीट स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्याकडे १८ एप्रिल १९७४ रोजी दिले. त्यावेळी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीला जात होते. स्वामींनी ते पाकीट प्रथम आळंदीला माऊलींच्या समाधीवर अर्पण करा व नंतर वाचा असे सांगितले. त्याप्रमाणे ते काव्य आळंदीला अर्पण होऊन समाधीच्या दिवशी वाचले गेले.

निर्वाणापूर्वी वर्षभर ८ ते १० लोकांखेरीज कुणालाही खोलीत प्रवेश नव्हता. भाऊ देसाई दर हंगामात पुण्यास आंबे विक्रीसाठी जात. पण यावर्षी ते पावसमध्येच थांबले. शनिवार रात्री १ वाजल्यापासून २८ जुलै १९७४ च्या सायंकाळपर्यंत एकोणीस  तास स्वामींनी काहीही घेतले नाही. एकप्रकारे ध्यानमग्न स्थितीत होते.डाव्या कुशीवर निजलेल्या त्यांचा मंद श्वासोच्छ्वास सुरु होता. आजाराची तीव्रता इतकी होती की २९ जुलै १९७४ ची रात्र काळरात्र ठरणार की काय असे वाटत होते.पण ३० तारखेला ते दडपण थोडे कमी झाले. त्याच रात्री ॐ राम कृष्ण हरि हा मंत्र स्वतःः ध्वनीयुक्त आवाजात ( मोठ्याने  ) सुरु करून आळीपाळीने इतरांंकडून करवून घेतला.आजाराची बातमी कळल्यामुळे मुंबईहून  वहिनी, पुतणे आले. आजाराच्या तीव्रतेची वार्ता ऐकून इतर भक्त मंडळी तर दर्शनाला येतंच होती. ३१ जुलैला प्रकृती थोडी सुधारली. त्यामुळे अनेक भक्तगण परत आपापल्या गावी गेले. १ ऑगस्ट ते ३ऑगस्ट या तीन दिवसात प्रकृती ठीक होती. थोडे अन्नही स्वामींनी घेतले. पण ४ ऑगस्टला अशक्तपणा अधिकच वाटू लागला.५ ऑगस्ट रोजी रात्रौ ९ पासून दि.७ ऑगस्टच्या सकाळी ११ पर्यंत सतत ३८ तास ध्यानावस्थेत पडून होते.दि.७ ऑगस्ट रात्री ९ पासून ८ ऑगस्टच्या सायंकाळी ५ पर्यंत २० तास त्याच प्रमाणे पडून होते. १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट याकाळात अशक्तता अजून वाढली. फार अन्न पण घेतले नाही. या काळात त्याच अवस्थेत भक्तांना दर्शनही देत होते. भक्तांचा जप सुरु होता.

पण १४ ऑगस्ट १९७४ रोजी देहाची कुडी सोडण्याची वेळ जवळ आल्यासारखे वाटू लागले. शारीरिक क्रिया मंद झाल्या. स्वामी रात्रभर डाव्या कुशीवर निजून होते. काहीही घेतले नाही. त्याचदिवशी संध्याकाळी एक वानर स्वामींच्या खोलीच्या छपरावर येऊन बसले. काहीकेल्या ते तेथून हटेना. दि. १५ ऑगस्ट १९७४ चा दिवस उजाडला. सकाळी सहा वाजता स्वामींचे हात, पाय,कानाच्या पाळ्या व कमरेपर्यंतचा भाग गार होता. पण छाती, पोटमान व डोके गरम होते. श्वासोच्छवास दीर्घ व  संथपणे सुरु होता. सात वाजता कुशीवरून उताणे होऊन एक चमचा पाणी घेतले. सात वाजून पन्नास मिनिटांनी जवळील दर्शनार्थींना दर्शन दिले. आठ वाजता खुणेने काही सांगून पडून राहिले. पावणे नऊच्या सुमारास जरा घसा खाकारल्यासारखे, खोकल्यासारखे वाटले म्हणून जवळ असणाऱ्या संजय लाड यांनी विजय देसाई यांना बोलावले. त्यांनी लगेच बाबा देसाई यांना बोलावले. स्वामींच्या तब्येतीत अचानक झालेला बदल पाहून बाबांनी चटकन गंगा आणली, दोघांनी दोन चमचे गंगाजल स्वामींच्या मुखात घातले. ते गंगाजल उदरस्थ झाले आणि शेवटपर्यंत चांगल्या सावध अवस्थेत परमात्म्याशी पूर्ण योग साधून या देहाच्या कुडीचा स्वामींनी त्याग केला. त्याबरोबर सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ते कपिराज तेथून निघाले ते परत आलेच नाहीत. स्वामींनी देह ठेवल्यानंतर दुसऱ्यादिवशी अनंतनिवासातून त्यांची यात्रा समाधीस्थळी आणली. गर्तेमध्ये ज्याभागात स्वामींचा मंगल देह ठेवण्यात आला तिची लांबी रुंदी आणि खोली ४ फुट होती.तिच्या वरच्या बाजूस चोहीकडून ४ फुट अंतर सोडून उत्तर व दक्षिण बाजूस तीन तीन पायऱ्या व पश्चिम बाजूला चार पायऱ्या होत्या.गर्तेमध्ये दर्भाचे आसन तयार करण्यात आले.त्याची अग्रे उत्तरेला ठेवण्यात आली होती.त्यावर पांढऱ्याशुभ्र मिठाचा एक थर पसरून त्यावर शुभ्र असे कांबळे ठेवण्यात आले.त्यानंतर त्यावर मृगाजिन घालण्यात आले.त्यावर श्रीस्वामींचा मंगल देह पश्चिमाभिमुख आणि पद्मासनस्थ असा ठेवण्यात आला.त्यांच्या समोर अभंग ज्ञानेश्वरी आणि नित्योपयोगी वस्तू ठेवल्या गेल्या. आळंदीहून आलेली प्रसाद वस्त्रे लेवविण्यात आली. सज्जनगडावरून आलेली रामनाम असणारी शाल त्यांच्या मांडीवर ठेवण्यात आली. मिठाचे थर, कापूर-चंदनाची पूड, केशर-कस्तुरी, सुगंधीद्रव्ये यांनी स्वामींचा देह आच्छादीत केला. ब्रह्मरंध्रावर अष्टगंधाचा थर देण्यात आला. स्वामींच्या आवडीचे गावठी गुलाबपुष्प ठेवण्यात आले. त्यावर मीठचंदनाची पूड यांचे मिश्रण घालून तो भाग झाकून टाकला. मृत्तिकेचा थर नीट पसरून त्यावर कोल्हापूर येथील जामसंडेकर यांनी ज्योतिबाच्या डोंगरातील  काढलेली काळ्या पाषाणाची, दीड टन वजनाचीवर ॐकार कोरलेली शिळा ठेऊन समाधिगर्ता बंद करण्यात आली.  त्या गर्त्यावर एक लहान झोपडी  बांधली.  तिथेच  भव्य समाधि मंदिर साकारले आहे.

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :