आजची पूजा
प्रातः समृद्ध पूजा
सायं समृद्ध पूजा
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पावस हे गाव आहे. रत्नागिरी हे शहर आणि जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथून १२ किलोमीटर अंतरावर पावस हे गाव आहे. पूर्वीच्या शेतीच्या उद्योगाला आता आंब्याच्या व्यापाराची जोड मिळाली आहे. आचारविचारांना आधुनिकतेचे वळण लागले असले तरी जुन्या आचारविचारांचे राहणीमान काही खेडेगावातून नमुन्यादाखल पहावयास मिळते. अज्ञान आणि दारिद्र्य यांचे उच्चाटन होत असून उज्ज्वल भविष्यकाळाची सुख स्वप्ने आता पडू लागली आहेत.
कोकण हे अनेक अडचणींचे आगर असले तरी त्याची जी दुसरी बाजू आहे ती मानवी मूल्यांचे महत्व वाढवणारीच आहे. जेव्हा आपण कोकण सोडून अन्य भाग पाहू लागतो तेव्हा कोकणची ठळक वैशिष्टये दिसू लागतात.
विशाल व घनदाट वृक्षाराजीनी मंडित अशी गावे आणि त्यांत ऋषींच्या आश्रमाप्रमाणे वसलेली दूरदूर घरे सबंध बृहन्महाराष्ट्रात अन्यत्र कोठेही पाहावयास मिळणार नाहीत. मधून मधून बाराही महिने वाहणारे पाण्याचे पाट व नारळी पोफळीच्या बागा यांची नयन मनोहर शोभा आणि वसंत ऋतूतील फलपुष्पादिकांनी नटलेली गावे , वैभवाची वासंतिक प्रभा ही सर्व पाहून कोकणाबाहेरील कोणाही व्यक्तीला कोकणचा हेवा वाटल्याशिवाय कसा राहील ? एरव्ही गरीब असलेला समाज स्वभावानेही गरीबच आहे. पापभीरु व साध्याभोळ्या स्वभावामुळे या भागात एक प्रकारची सात्विक शांतता नांदते.