समाधी मंदिरात पहाटे ५-३० ते ६ पर्यंत भूपाळी गाऊन काकड आरती केली जाते. नंतर सकाळी ८. ते १० पर्यंत समृद्ध पूजा अभिषेक संपन्न होऊन दहा वाजता आरती करण्यात येते. दुपारी १२ वाजता नैवेद्य व आरती होऊन संध्याकाळी ६.३० ते ७-३० पर्यंत सायं(प्रदोष) पूजा व त्यानंतर आरती करण्यात येते. आरती म्हणजे जणू राष्ट्रगीत या भावनेने मंदिरात अशी पद्धती व शिस्त पाळली जाते की आरतीच्या वेळी शक्यतो संत मंडपात उपस्थित असावे, तथापि जमले नाही तर मंदिर परिसरात जिथे कुठे जो कोणी असेल त्याने तिथेच थांबून शांतपणे आरती म्हणावी किंवा आरती संपेपर्यंत शांतपणे उभे राहावे. अन्य कोणतेही काम अथवा चर्चा करू नये. समाधी मंदिरातील संत मंडपात श्रावण वद्य द्वादशीस असणाऱ्या श्रीमत् स्वामीजींच्या पुण्यतिथी पूर्वी अखंड ७२ तास ॐ राम कृष्ण हरि या मंत्राचा जप करण्यात येतो. भक्तिभावपूर्ण अत्यंत श्रद्धेने जप करणाऱ्या स्त्री-पुरुष भक्तांमुळे संत-मंडपातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. पुढे फाल्गुन वद्यपंचमीस मंदिरातील श्री देव विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा व मंदिरवर्धापन दिनाचा उत्सव साजरा केला जातो. त्यापूर्वी पाच दिवस संत मंडपातच आध्यात्मिक प्रवचने होतात.